अरविंद केजरीवाल यांनी घोटाळ्यादरम्यान १७३ फोन नष्ट केले

ईडीचा सर्वोच्च न्यायालयात दावा

अरविंद केजरीवाल यांनी घोटाळ्यादरम्यान १७३ फोन नष्ट केले

अरविंद केजरीवाल यांनी घोटाळ्याच्या कार्यकाळात सुमारे १७० मोबाइल फोन व मोठ्या संख्येने पुरावे नष्ट केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आल्याचा दावा ईडीने सर्वोच्च न्यायालयात केला आहे. कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात कैद असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले.

‘घोटाळ्याच्या काळात त्यांनी सुमारे १७० मोबाइल फोन नष्ट केले आणि जेव्हा अनियमितता लोकांसमोर आली तेव्हा पुरावेही मोठ्या प्रमाणात नष्ट करण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली,’ असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. तपास अधिकाऱ्याने नऊ वेळा समन्स बजावूनही आम आदमी पक्ष चौकशी टाळत असल्याचे प्रतिज्ञापत्रात अधोरेखित करण्यात आले आहे.

अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या समन्सकडे वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे आणि दिल्ली उच्च न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण मिळवण्यात अयशस्वी झाल्यामुळे अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आल्याचेही यात स्पष्ट करण्यात आले आहे. ‘जेव्हा याचिकाकर्त्याला दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडून दिलासा मिळू शकला नाही, तेव्हाच त्यांच्या घराची झडती घेण्यात आली आणि त्याला अटक करण्यात आली,’ असे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

विशेषतः लोकसभा निवडणुका जवळ आल्या असताना, मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली, याकडे लक्ष वेधण्यात आले असताना अंमलबजावणी संचालनालयाने सर्वोच्च न्यायालयापुढे हे स्पष्ट केले की, आरोपीला तो कोण आहे, याची पर्वा न करता केवळ भक्कम पुराव्यावर आधारित अटक केली आहे. गुन्हेगारी आरोप असलेल्या राजकारण्यांना अटकेपासून दिलासा दिल्यास निवडणूक प्रक्रियेच्या अखंडतेला धक्का बसेल, असेही तपास संस्थेने म्हटले आहे.

‘पुराव्यावर आधारित गुन्ह्यासाठी एखाद्या व्यक्तीला अटक केल्याने कधीही मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांच्या संकल्पनेचे उल्लंघन होऊ शकत नाही. उपरोक्त युक्तिवाद मान्य केल्यास, गुन्हेगार असलेल्या राजकारण्यांना अटकेपासून संरक्षण मिळेल,’ असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

प्रतिज्ञापत्रावर प्रतिक्रिया देताना, ‘आप’ने दावा नाकारून तपास संस्था खोटे बोलत असल्याचा दावा केला. तसेच, अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नसल्याचे स्पष्ट केले. दिल्लीतील सत्ताधारी पक्षाने असेही म्हटले आहे की, ईडी भाजपची राजकीय शाखा म्हणून काम करत आहे.

‘ईडी हे खोटे बोलण्याचे एक मशीन आहे आणि ते भाजपच्या राजकीय शाखेप्रमाणे काम करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणेकडे अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत. ही ईडीची चौकशी नाही, तर भाजपची चौकशी आहे. भाजपला अरविंद केजरीवाल यांच्या निवडणूक प्रचाराच्या कामात अडथळा आणायचा आहे,’ असा आरोप ‘आप’कडून करण्यात आला.

हे ही वाचा:

अमेठी, रायबरेली भेटीपूर्वी गांधी भावंडे अयोध्येला थांबण्याची शक्यता

जनता दलाच्या नेत्याची गोळी झाडून हत्या!

भारतात तीन दशकांहून अधिक काळ वारसा कर होता, इंदिरा गांधींची संपत्ती त्यांच्या नातवंडांना हस्तांतरित करण्याच्या एक महिना आधी राजीव गांधी सरकारने तो रद्द केला!

‘डीआरडीओ’ने बनविले भारतीय सैन्यासाठी विशेष ‘बुलेट प्रूफ जॅकेट’

अरविंद केजरीवाल यांना तपास यंत्रणेने २१ मार्च रोजी दिल्लीतील त्यांच्या सरकारी निवासस्थानातून अटक केली होती. सध्या ते तिहार तुरुंगात आहेत. केजरीवाल हे त्यांच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झालेले नसून ते तुरुंगातून सरकार चालवणार असल्याचे आम आदमी पक्षाने ठामपणे सांगितले आहे.

Exit mobile version