अरुण गवळी याच्या अखिल भारतीय कामगार सेनेसह अरुण गवळी आणि आशा गवळी यांच्याविरुद्ध मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेत २००६ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. या आरोपातून दोषमुक्त करण्यास आशा गवळीला न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे आशा गवळीच्या अडचणीत भर पडली आहे.
ग्लोब ऑटो इलेक्टिकल कंपनीच्या कामगाराची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेत २००६ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. यापूर्वी आशा गवळीने न्यायदंडाधिकारी न्यायालयात मुक्ततेसाठी याचिका दाखल केली होती, मात्र न्यायालयाने ती फेटाळल्यानंतर आशा गवळीने सत्र न्यायालयात गुन्ह्यातून दोषमुक्त करण्यासाठी धाव घेतली होती परंतु सत्र न्यायालयाने तिला दोषमुक्त करण्यास नकार दिला आहे.
ग्लोब ऑटो इलेक्ट्रिकल्स आणि त्यांचे ४६९ कर्मचारी यांच्यातील हा वाद आहे. १९८१मध्ये ही कंपनी बंद पडल्यानंतर या कामगारांना कमी करण्यात आले. अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेना या पक्षाच्या अखिल भारतीय कामगार सेनेला या कामगारांच्या वतीने खटला चालविण्याची परवानगी देण्यात आली.
हे ही वाचा:
ब्रह्मास्त्रावर बहिष्कारास्त्र चालणार?
पिंपरीतील छोट्या आदित्यची हत्या अपहरणातून नव्हे प्रेमप्रकरणातून
अखेर औरंगाबादमधील यूट्युबर ‘बिंदास काव्या’ या ठिकाणी सापडली
म्हणून श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन तासनतास लांबले
कंपनीच्या मालकांशी तडजोड केल्यानंतर अ.भा. कामगार सेनेला ४ कोटी रुपये देण्यात आले. ते कामगारांमध्ये वितरित करायचे होते. पण कामगारांना त्यांच्या वाट्याचे पैसेच मिळाले नाहीत. तेव्हा या कामगार सेनेविरोधात २००६ ला खटला दाखल करण्यात आला.
अ.भा. सेनेचे अध्यक्ष अरुण गवळी, उपाध्यक्ष आशा गवळी, खजिनदार सुनील कालेकर आणि विजय गवळी यांना याप्रकरणात आरोपी करण्यात आले. त्यांनी या ४ कोटींपैकी १.७७ कोटींचा अपहार केल्याचा हा आरोप आहे. याचसंदर्भात आशा गवळीने न्यायालयाकडे याचना केली की, ती या सेनेची पदाधिकारी आहे म्हणजे या कटात ती सामील आहे असा अर्थ होत नाही. त्यामुळे आपली सुटका करावी. पण न्यायदंडाधिकाऱ्यांनी तिचा अर्ज फेटाळला. नंतर ती सत्र न्यायालयात गेली तिथेही न्यायालयाने तिला सोडण्यास नकार दिला.