सेवा विकास सहकारी बँकेच्या घोटाळ्यासंदर्भात ईडी मुंबईने तीन जणांना अटक केली असून यातील एक हा बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांचा सहकारी आहे. तसेच ईडी कार्यालयातील दोन ऑफिसबॉयनाही यात अटक करण्यात आली आहे. जे मूलचंदानी यांना माहिती पुरवत होते.
सेवा विकास सहकारी बँकेत ४२९ कोटींचा घोटाळा झाला होता. त्यासंदर्भात ईडीने तपास सुरू केला आहे. पुणे पोलिसांनी याबाबत अनेक एफआयआर दाखल केले आहेत. सहकारी संस्थांच्या रजिस्ट्रारकडून करण्यात आलेल्या लेखापरीक्षणातून हा घोटाळा बाहेर आला होता. ईडीच्या तपासात ही बाब समोर आली की, या बँकेचा कारभार एका कुटुंबाच्या मालकीची बँक असल्याप्रमाणे केला गेल्याचे समोर आले. त्यात सर्व अर्थविषयक नियम, कर्जपुरवठ्याच्या नियमावलीचा भंग करण्यात आल्याचेही निदर्शनास आले होते. कर्जपुरवठा करताना तारणासंदर्भात कोणतीही काळजी घेतली गेली नाही. कर्जाचा परतावा करण्याची अर्जदाराची क्षमता आहे की नाही, याचीही तमा बाळगली गेली नाही. जवळपास ९२ टक्के कर्जे ही फेडलीच गेली नाहीत. त्यामुळे बँक ही दिवाळखोर बनली.
हे ही वाचा:
जीएसटीशी संबंधित वाद आता झटपट सुटणार
केंद्र सरकारचा सामान्यांना मोठा दिलासा, सिलिंडरसाठी मिळणार २०० रुपये सबसिडी
आता दोन मिनटात बनवा ‘थंडगार बिअर’
हताश पवारांच्या खटपटी ममतांच्या लटपटी…
या सगळ्या तपासात ही गोष्टी स्पष्ट झाली की, एक व्यक्ती हा कायम ईडीच्या कार्यालयाबाहेर फिरत असल्याचे दिसले. तो मूलचंदानी यांचा सहकारी बाबू सोनकर असल्याचे स्पष्ट झाले. यासंदर्भातील साक्षीदारांना धमकावण्याचे काम हा करत होता. त्यासाठी तो ईडीच्या कार्यालयातील डेटा एन्ट्री ऑपरेटर तसेच ऑफिसबॉयला हाताशी धरून आवश्यक ती माहिती काढून घेण्याचेही काम करत होता. याबाबत ईडीने कारवाई करत सोनकरसह या दोघांनाही अटक केली. सोनकर व या दोघांकडून काही महत्त्वाची कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आली आहेत.
ही अटक करण्यात आल्यानंतर या दोन कर्मचाऱ्यांनी ही कबुली दिली आहे की, त्यांच्यामार्फत ईडीच्या कार्यालयातून महत्त्वपूर्ण माहिती सोनकरला पुरविण्यात येत होती. आता पीएमएलए अंतर्गत तिघांनाही अटक करण्यात आली आहे.