दिशा सालियन संशयास्पद मृत्यूचे प्रकरण पुन्हा एकदा उफाळून वर आले आहे. पाच वर्षांपूर्वी घडलेली ही घटना विस्मृतीत गेली असे वाटत असताना दिशाच्या वडिलांनी केलेल्या नव्या दाव्यांमुळे आणि मागणीमुळे पुन्हा एकदा खळबळ उडविणार आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून तातडीने या प्रकरणात सामुहिक बलात्कार, हत्या या आरोपांखाली एफआयआर दाखल करण्यात यावा तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, रिया चक्रवर्ती आणि इतरांना अटक करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. सतीश सालियन यांनी रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी यांना दिलेल्या मुलाखतीत या याचिकेमागील त्यांची भूमिका विषद केली आहे. या प्रकरणात सतीश सालियन यांचे वकील आहेत निलेश ओझा.
या याचिकेत अनेक न्यायवैद्यक पुरावे, साक्षीदारांचे जबाब तसेच फोन कॉलचे रेकॉर्ड्स यांच्या आधारे हे प्रकरण राजकीय नेत्यांच्या, बॉलिवूडमधील मंडळी तसेच पोलिसांच्या दबावाखाली दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या याचिकेत आरोप करण्यात आले आहेत की,
- दिशा सालियनकडे अशी खळबळजनक माहिती होती ज्यामुळे आदित्य ठाकरे यांचे बिंग फुटले असते.
- एका बॉलिवूड पार्टीत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाले होते आणि त्या पार्टीत आदित्य ठाकरे, सूरज पांचोली व इतर उपस्थित होते. त्याची साक्षीदार दिशा सालियन होती.
- पण हे तिने उघड करू नये म्हणून तिची हत्या करण्यात आली.
- न्यायवैद्यक पुरावे, साक्षीदारांचे जबाब, कॉल रेकॉर्ड्स यावरून दिशावर सामुहिक बलात्कार झाला होता तसेच नंतर तिची हत्या झाली होती. नंतर तिचा मृतदेह इमारतीच्या खाली ठेवून तिने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्यात आल्याचा देखावा करण्यात आला.
हे ही वाचा:
युद्धग्रस्त गाझामधील परिस्थितीबद्दल भारताने व्यक्त केली चिंता
नागपूर हिंसाचार: विहिंप आणि बजरंग दलाच्या आठ कार्यकर्त्यांचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण!
आपचा सीसीटीव्ही घोटाळा; सत्येंद्र जैन यांच्यावर ७ कोटींची लाच घेतल्याचा आरोप
या याचिकेत जे शास्त्रीय आणि न्यायवैद्यक पुरावे सादर करण्यात आले आहेत त्यानुसार दिशा ही १४व्या मजल्यावरून खाली कोसळलीच नव्हती. तिची हत्या अन्यत्र कुठेतरी करण्यात आली होती.
याचिकेत म्हटले आहे की, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी हे सांगितले की, जिथे दिशाचा मृतदेह होता तिथे रक्त नव्हते. इतक्या उंचीवरून पडल्यानंतर रक्त नव्हते असे शक्यच नव्हते. दिशाच्या शरीरावर कोणतेही फ्रॅक्चर नव्हते. तिच्या डोक्यालाही मार नव्हता. अंतर्गत अवयवांनाही कोणताही मार नव्हता. याचा अर्थ ती १४व्या मजल्यावरून खाली कोसळली नव्हती. पोलिसांनी जे दावे केले होते त्याविरुद्ध तिची अंत्यविधीची छायाचित्रे व प्रत्यक्षदर्शींचे जबाब सांगत आहेत. इमारतीवरून पडल्यानंतरच्या कोणत्याही खुणा चेहऱ्यावर दिसत नव्हत्या. तिच्या किंवा तिला रुग्णालयात नेणाऱ्या व्यक्तींच्या कपड्यांवर कोणतेही रक्ताचे डाग नव्हते. या याचिकेत दिशा सालियन आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूचा परस्पर संबंध सिद्ध होत असल्याचे म्हटले आहे.
याचिकेत म्हटले आहे की, दिशाच्या मृत्यूनंतर आपल्यालाही मारले जाईल, अशी भीती सुशांतने आपल्या निकटवर्तियांकडे व्यक्त केली होती.
- त्याची वागणूक बदलली. तो आपल्या खोलीत झोपण्यासही जात नसे. तसेच आपली सिम कार्डही वारंवार बदलत असे.
- पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती जाहीर करण्याचा विचारही सुशांतने केला होता.
- याचिकेत नमूद आहे की, रिया चक्रवर्ती ही आदित्य ठाकरेंसाठी काम करत असे आणि तिने ही माहिती त्यांच्याकडे दिली. त्यानंतर दिशा आणि सुशांत यांना मार्गातून हटविण्यात आले.
- याचिकेत मागणी करण्यात आली आहे की, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, रिया चक्रवर्ती आणि इतरांविरोधात सामुहिक बलात्कार, हत्या आणि हत्येचा कट याबाबत एफआयआर दाखल करण्यात यावा.
- हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात यावे.
- सर्व साक्षीदारांच्या, पत्रकारांच्या, कायदेतज्ज्ञांच्या तसेच या प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या समीर वानखेडे यांच्या सुरक्षिततेचा विचार व्हावा.
- हटविण्यात आलेल्या सर्व फाइल्स, सीसीटीव्ही फूटेज, छेडछाड केलेले न्यायवैद्यक पुरावे हस्तगत करण्यात यावेत.
- हा खटला महाराष्ट्राबाहेर चालवावा, जेणेकरून निष्पक्ष चौकशी व तपास होईल.