बीकेआय प्रतिबंधित दहशतवादी गटाला शस्त्र पुरवठा करणाऱ्याला मुंबईत ठोकल्या बेड्या

एनआयएची मोठी कारवाई

बीकेआय प्रतिबंधित दहशतवादी गटाला शस्त्र पुरवठा करणाऱ्याला मुंबईत ठोकल्या बेड्या

राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने सोमवारी खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग उर्फ लांडा आणि गुंड बचितर सिंग उर्फ बाटला याच्या प्रमुख साथीदाराला मुंबईतून अटक केली आहे. पंजाबमधील दहशतवादी कट प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून यात जतिंदर सिंग उर्फ ज्योती याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. जतिंदर सिंग हा पंजाबमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवादी नेटवर्कचा प्रमुख सदस्य आहे.

बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचा जतिंदर हा सदस्य असून तो लांडा आणि बाटला याचा जवळचा सहकारी म्हणून ओळखला जात असल्याची माहिती आहे. पंजाबमधील लांडा आणि बाटलाच्या कार्यकर्त्यांसाठी शस्त्रे खरेदी करण्यात जतिंदरचा सक्रिय सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे. जुलै २०२४ मध्ये अटक करण्यात आलेल्या मध्य प्रदेशातील पुरवठादार बलजीत सिंग उर्फ राणाभाईकडून त्याने शस्त्रे मिळवली होती. अनेक वर्षांपासून मध्य प्रदेशातून शस्त्रे मिळवून जतिंदर पंजाबमधील त्यांच्या सदस्यांना पुरवत होता. एनआयए त्याच्या मागावर असल्याचे समजताच तो मध्य प्रदेशातील त्याच्या लपण्याच्या ठिकाणाहून पळून गेला आणि पाच महिने मुंबईत लपला होता.

एनआयएला जतिंदर सिंग हा मुंबईच्या पूर्व उपनगरातील ट्रॉम्बे येथे असल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच त्याला अटक करण्यात आली. मुंबईत तो जेसीबी क्रेन ऑपरेटर म्हणून काम करत होता. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, जतिंदर हा मूळचा पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील असून, जुलै २०२४ मध्ये मध्य प्रदेशातील शस्त्रास्त्र पुरवठादार बलजीत सिंग उर्फ राणाभाई याच्या अटकेपासून फरार होता. जतिंदर पूर्वी मध्य प्रदेशातील इंदूर येथे राहत होते. तिथे देखील तो लपून राहत असताना जेसीबी क्रेन ऑपरेटर म्हणून काम करत होता.

हे ही वाचा:

चित्रपटांसाठी १८ राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी असणारे श्याम बेनेगल यांची कारकीर्द कशी होती?

मुंबईतून ६ घुसखोर बांगलादेशीना अटक, निवडणुकीत झाले मतदान!

फडणवीस ‘बांबूंची लागवड’ करतील का?

घराचे नाव ‘रामायण’ अन घरच्या लक्ष्मीला कोणीतरी पळवून नेईल!

एनआयएच्या म्हणण्यानुसार, जतिंदर मध्य प्रदेशातून पंजाबमध्ये अतिरिक्त शस्त्रास्त्रांची तस्करी करण्याची योजना आखत होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून तपास यंत्रणा सातत्याने त्याच्या मागावर असल्यामुळे त्याच्या योजनांना यश येत नव्हते. जतिंदरची अटक शस्त्रास्त्रे, दारूगोळा, स्फोटके इत्यादींची तस्करी रोखून आणि भारतीय भूमीवर दहशतवादी कारवाया करण्यासाठी निधी उभारून दहशतवादी-गँगस्टरचे संबध मोडून काढण्याच्या एनआयएच्या प्रयत्नांमध्ये एक मोठे पाऊल आहे, असे तपास संस्थेने म्हटले आहे.

Exit mobile version