दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’ पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणी ईडीकडून अटक झालेली असून ते सध्या ईडीच्या कोठडीमध्ये आहेत. मात्र, अटकेनंतरही अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला नसून ते तुरुंगातूनचं राज्याचा कारभार चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अटकेनंतर आपण तुरुंगातून सरकार चालवणार असल्याचे केजारीवाल आणि त्यांच्या पक्षाने जाहीर केले होते. अशातच अरविंद केजरीवाल यांनी ईडी कोठडीमधूनच पहिली ऑर्डर पास केली होती. अरविंद केजरीवाल यांनी काढलेली ही ऑर्डर ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकली असून मंगळवार, २६ मार्च रोजी त्यांनी कोठडीतून दुसरा आदेश जारी केला आहे.
मंगळवारी अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज यांना रुग्णालये आणि मोहल्ला क्लिनिकमध्ये मोफत औषधे मिळत राहतील आणि रुग्णांच्या वैद्यकीय चाचण्या सुरळीतपणे केल्या जातील याची खात्री करण्यास सांगितले आहे. स्वतः मंत्री सौरभ भारद्वाज यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, “मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीच्या कोठडीत असतानाही सामान्यांच्या अडचणी वाढू नयेत, असे वाटत आहे.”
“दिल्लीतील जनतेला मोफत औषधे आणि मोफत चाचण्या मिळत राहाव्यात, अशी अरविंद केजरीवाल यांची इच्छा आहे. त्यांनी सतत रुग्णालयांना भेटी देण्यास सांगितले आहे. केजरीवाल ईडीच्या कोठडीत असूनही त्यांना दिल्लीतील लोकांच्या आरोग्याची काळजी आहे. मोहल्ला क्लिनिकमध्ये औषधांचा अभाव असल्याने मुख्यमंत्री चिंतेत आहेत. मोहल्ला क्लिनिकमध्ये मोफत औषधे आणि चाचण्या देत राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यांचा आदेश हा देवाच्या आदेशासारखा आहे,” असं सौरभ भारद्वाज म्हणाले.
ईडी कोठडीतून दिलेला पहिला आदेश चौकशीच्या फेऱ्यात
अरविंद केजरीवाल यांनी २३ मार्च रोजी कोठडीतून पहिला आदेश जारी केला होता. त्यांनी जलमंत्री आतिशी मार्लेना यांना दिल्लीतील अनेक भागातील पिण्याच्या पाण्याची आणि गटाराची समस्या सोडवण्याची सूचना केली होती. माध्यमांशी बोलताना आतिशी म्हणाल्या की, “दिल्लीच्या काही भागात पाणी आणि गटारांशी संबंधित अनेक समस्या समोर येत असल्याचे मुख्यमंत्र्यांना समजले असून या समस्या तातडीने सोडविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. तुरुंगात असल्याने जनतेला कोणतीही अडचण येऊ नये, असे मुख्यमंत्र्यांचे मत आहे.”
हे ही वाचा:
विराट कोहलीच्या दमदार फलंदाजीमुळे बेंगळुरूचा मोसमातील पहिला विजय
‘मोदी मोदीचा गजर करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कानशिलात लगावा’
“भारत माता की जय, जय हिंद हे नारे रचणारे मुस्लीम होते”
सीबीआयकडून विझाग बंदरावर २५ हजार किलो कोकेन मिश्रित यीस्ट जप्त
दरम्यान, कोठडीतून देण्यात आलेल्या या पहिल्या ऑर्डरसंबंधी ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. या ऑर्डरबद्दल ईडीने सांगितले की, आम आदमी पक्षाने केलेल्या दाव्याची चौकशी केली जाईल. कोठडीत असलेल्यांना स्टेशनरी वापरण्याची परवानगी नाही. त्यामुळे ही ऑर्डर कशी काढण्यात आली. ती कथित ऑर्डर कोण घेऊन आले आणि ती कोणी आणि केव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचवली याबद्दल मंत्री आतिशी यांची चौकशी केली जाईल. तसेच सीसीटीव्ही फुटेजद्वारे यासंबंधीच्या दाव्याची पडताळणी केली जाईल.