अमृतसरमधील सचखंड श्री हरमंदिर साहिबजवळ बुधवारी मध्यरात्री आणखी एक स्फोट झाला. ही आतापर्यंतची तिसरी घटना आहे. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, त्याचा आवाज ३०० मीटर दूरपर्यंत ऐकू आला.
बुधवारी मध्यरात्री सुमारे १२ वाजून ४० मिनिटांनी हा स्फोट झाला. हे ठिकाण पहिल्या दोन स्फोटांच्या विरुद्ध दिशेला आहे. हेरिटेज स्ट्रीट भागात झालेल्या आधीच्या दोन स्फोटांपासून आताचे स्फोटाचे ठिकाण सुमारे एक किमी दूर आहे. पोलिस आयुक्त नौनिहाल सिंग यांनी या घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती दिली.
स्फोटाची माहिती कळताच, वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी पोहोचून तेथील अवशेष जमा करण्याचे काम सुरू केले. पोलिसांनी चारही दिशांनी घटनास्थळाला सील केले आहे. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. तसेच, आणखी एक स्फोट घडू शकतो, असे पोलिस सांगत आहेत.
हा स्फोट श्री गुरू रामदास सराच्या मागील बाजूस असलेल्या गल्लीत झाला. या स्फोटात कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झालेली नाही. मात्र पोलिसांचा तपास सुरू आहे, असे घटनास्थळी उपस्थित असलेले सचखंड श्री हरमंदिर साहिबचे व्यवस्थापक विक्रमजीत सिंग यांनी सांगितले.
हे ही वाचा:
डिझेलच्या गाड्या बंद करायच्या आहेत, पण तूर्तास नाही!
‘घटनातज्ज्ञां’ वर होईल का सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब?
सत्तासंघर्षाचा पेच उद्या सुटणार?
इस्लाम कबूल न केल्यामुळे पत्नीची केली हत्या
याआधी शनिवारी उशिरा रात्री आणि सोमवारी सकाळी हेरिटेज स्ट्रीटवरील सारागढी सरा ठिकाणाजवळ स्फोट झाले होते. या दोन्ही स्फोटांचा पंजाब पोलिस आणि फॉरेन्सिक पथक तपास करत आहे. एनआयए आणि एनएसजी पथकानेही घटनास्थळाची पाहणी करून स्फोट कसा घडवला असावा, याची चाचपणी केली. त्यासाठी ते दृश्य पुन्हा घडवले गेले. तसेच, तेथील पाने आणि मातीचे नमुने जमा करून ते त्यांनी तपासासाठी पाठवले. त्यांचा अहवाल अद्याप मिळालेला नाही.