अमृतसरमध्ये सुवर्णमंदिराजवळच्या हेरिटेज स्ट्रीट परिसरात सोमवारी सकाळी साडेसहा वाजता पुन्हा स्फोट झाला. याआधी याच ठिकाणी शनिवारी रात्री स्फोट झाला होता. आता पुन्हा त्याच ठिकाणी हा स्फोट झाला आहे. अवघ्या ३२ तासांच्या आत हा दुसरा स्फोट झाला आहे. आधीच्या स्फोटांच्या कारणांचा पोलीस तपास करत असतांनाच हा दुसरा धक्का बसला आहे. लागोपाठ झालेल्या या घटनांमुळे या भागात घबराट पसरली आहे. सकाळची वेळ असल्याने सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शनिवारी रात्री उशिरा याच रस्त्यावर स्फोट झाला होता. त्यावेळी रस्त्यावर वर्दळ होती. घटनास्थळी उपस्थित अनेक भाविक आणि स्थानिक लोकांनी हा स्फोट दहशतवादी घटना असल्याचे मानले होते. आधीच्या स्फोटाच्या धक्क्यामुळे इमारतीच्या काचा फुटून लागल्यामुळे पाच जण जखमी झाले होते. सोमवारी सकाळी पुन्हा हेरिटेज स्ट्रीटवरच दुसरा स्फोट झाला आहे.
हा स्फोट आधीच्या ठिकाणापासून २० मीटर अंतरावर झाला आहे. शनिवारच्या स्फोटांनंतर येथील नागरीकांनी दहशतवादी कारवाईची भीती व्यक्त केली होती. परंतु पंजाब पोलिसांनी हा घातपात नसून अपघात असल्याचे सांगितले होते. या स्फोटाचे फॉरेन्सिक नमुने गोळा करून कारणांचा शोध घेण्यात येत होता. पण त्याच्या आतच सोमवारी दुसरा स्फोट झाला आहे. त्यामुळे अमृतसर हादरून गेले आहे.
हे ही वाचा:
सुदानमधून आलेले भारतीय मोदींच्या प्रेमात
लष्करी परेडवर केलेल्या हल्ल्याबद्दल तेहरानमध्ये इराणी-स्विडिश नागरिकाला फाशी
राहुल म्हणजे एकदिवस सद्दाम, दुसऱ्या दिवशी अमूल बेबी
‘द केरळ स्टोरी’बद्दल चांगलं लिहिलं म्हणून तरुणाला केली मारहाण
सोमवारच्या घटनेनंतर अमृतसर पोलिसांचे बॉम्बशोधक पथक आणि फॉरेन्सिक विभागाचे पथकही घटनास्थळी पोहोचले. मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने आजूबाजूचा परिसर शोधला जात आहे. सीवरेज लाइन आणि गटर्सचीही तपासणी केली जात आहे.