ईडीच्या चौकशीला नंतर जाणार सामोरे
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर धाडसत्र आरंभल्यानंतर शनिवारी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी कार्यालयात बोलावले होते, पण त्यांना नेमक्या कोणत्या खटल्यासंदर्भात बोलावले आहे, हे माहीत नसल्यामुळे देशमुख आज कार्यालयात येणार नाही, असे देशमुख यांचे वकील जयवंत पाटील यांनी स्पष्ट केले. देशमुख यांनी या चौकशीसाठी वेळ मागून घेतला आहे. तशी मागणी देशमुख यांच्या वकिलांनी ईडीकडे केली आहे. ईडीकडून कोणत्या खटल्यासंदर्भात समन्स बजावण्यात आले आहे, हे माहीत करून घेण्यासाठी कागदपत्रे मागविली आहेत, असेही पाटील म्हणाले.
हे ही वाचा:
गुन्हेगारी टोळ्यांची धुंदी उतरवणार एनसीबी
आंदोलनकर्त्या भाजपा नेत्यांची धरपकड सुरु
करावे तसे भरावे…नारायण राणे बरसले
शरद पवारांनी केली अनिल देशमुखांची पाठराखण
शुक्रवारी देशमुख यांच्या नागपूर, मुंबईतील घरांवर ईडीने धाडी घातल्या. त्यानंतर त्यांचे स्वीय सचिव कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना ईडीने ताब्यात घेतले होते. त्यांना शनिवारी विशेष कोर्टात उभे करण्यात येणार आहे. त्यांची शुक्रवारी तब्बल ९ तास ईडीने चौकशी केली आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपल्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट कसे दिले जात होते, असा आरोप केला होता. त्यात देशमुख यांच्यावर त्यांनी हा थेट आरोप केला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामाही दिला. शुक्रवारी ईडीने देशमुख यांच्या नागपूर तसेच मुंबईतील दोन निवासस्थानांवर छापे मारले. त्याशिवाय, शिंदे आणि पालांडे यांच्या घरांवरही धाडी घालण्यात आल्या. वरळीच्या घरावर धाड घातली तेव्हा स्वतः देशमुख आणि त्यांची मुलेही तिथे उपस्थित होती.