तब्बल पाच समन्स पाठवूनही सक्तवसुली संचालनालयासमोर उपस्थित राहण्यास टाळाटाळ करणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज अखेर ईडीसमोर सकाळी ११.३० वाजता हजर झाले पण जवळपास १२ तास होत आले तरी त्यांना अद्याप सोडण्यात आलेले नाही. त्यांच्या अटकेची दाट शक्यता व्यक्त केली जात असून रात्री साडेअकरा वाजता त्यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे.
केंद्रीय तपास यंत्रणा एनआयएने सचिन वाझेला असेच चौकशीसाठी ताब्यात घेऊन रात्री साडे अकरा वाजता अटक केली होती. ईडीकडून कदाचित देशमुख यांना साडे अकरा वाजता अटक करण्यात येणार असल्याचे जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.
दिल्लीत पाठवलेले ईडीचे मुंबई विभागाचे उपसंचालक सत्यव्रत कुमार यांना तातडीने मुंबईत बोलवण्यात आले असून सायंकाळी ७ वाजता सत्यव्रत कुमार हे ईडीच्या कार्यलयात दाखल झाले आहे. सत्यव्रत कुमार यांनीच यापूर्वी देशमुख मनी लाँडरिंग प्रकरण पूर्णपणे हाताळले होते.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
हे ही वाचा:
अजित पवार आणि परिवाराचे कोट्यवधींचे घोटाळे उघड
‘एसटी कर्मचाऱ्यांच्या बायकापोरांना दिवाळी नाही का?’
नवाब मलिकांना भोगावे लागणार गंभीर परिणाम
नवाब मलिक तुम्ही मर्द असाल तर माझ्याऐवजी देवेंद्रजींना लक्ष्य करा!
आज सकाळी जारी झालेल्या एका व्हिडिओ निवेदनात अनिल देशमुख म्हणाले होते, “माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. जेव्हा मला ईडीकडून समन्स मिळाले, तेव्हा माझ्यावर तपास यंत्रणेला सहकार्य न केल्याचा आरोप करण्यात आला. पण मला हे स्पष्ट करायचे आहे की, जेव्हा जेव्हा मला हजर राहण्यास सांगितले गेले तेव्हा मी एजन्सीला सांगितले की, हे प्रकरण उच्च न्यायालयात आहे. मी त्यांना असेही सांगितले की मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे आणि लवकरच सुनावणी सुरू होणार आहे.” देशमुख म्हणाले होते की पोलीस प्रमुखांच्या अंतर्गत मुकेश अंबानी सुरक्षेच्या चौकशीत काही “अक्षम्य” त्रुटी उघड झाल्या आहेत.