मूळ ओडिशाची असणारी आणि विशाखापट्टणम येथे घरकामाला असणाऱ्या एका १७ वर्षांच्या मुलीवर तिचा मित्र आणि त्याच्या मित्रांनी तिच्याच वाढदिवशी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र तिचा दुर्दैवाचा फेरा संपला नाही. ही मुलगी आरके समुद्रकिनाऱ्यावर आत्महत्या करण्यासाठी गेली असता, मानसिक धीर देण्याच्या नावाखाली तेथील काही छायाचित्रकारांच्या गटाने तिला लॉजमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
ओडिशातील या मुलीवर तब्बल १३ जणांनी सामूहिक बलात्कार केला असून त्यातील ११ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती मंगळवारी पोलिसांनी दिली. सर्व आरोपींना १२ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून अन्य दोन आरोपींचा पोलिस कसून शोध घेत आहेत. ‘या अल्पवयीन मुलीवर तिचा मित्र आणि त्याच्या मित्रांनी बलात्कार केला. त्यानंतर ती आरके समुद्रकिनाऱ्यावर स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न करत असताना काही छायाचित्रकारांनी तिला उचलले, तिच्यावर काही दिवस बलात्कार केला आणि तिला ओडिशात नेऊन सोडले. ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी दोघांचा अपवाद वगळता सर्वांना अटक केली आहे,’ अशी माहिती आंध्र प्रदेश पोलिसांनी दिली आहे.
ही मुलगी नऊ महिन्यांपूर्वी ओडिशातून विशाखापट्टणम येथे आली होती. मात्र १७ डिसेंबरपासून ती बेपत्ता असल्याने तिच्या वडिलांनी विशाखापट्टणम येथे ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर २३ डिसेंबर रोजी मुलीच्या वडिलांना ओडिशा पोलिसांचा फोन आला. पोलिसांचे पथक, तिचे वडील यांनी २५ डिसेंबर रोजी या मुलीला पुन्हा विशाखापट्टणम येथे आणले. त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी तिने तिच्यावर गुदरलेला प्रसंग पालकांना सांगितला. तिच्यावर वेगवेगळ्या दिवशी अनेक लॉजमध्ये बलात्कार झाल्याचे तिने पोलिसांकडे दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
हे ही वाचा:
‘रामजींना एकटे ठेवू नका’, रामायणातील सीतेने पंतप्रधानांना केली विनंती!
राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी ‘पात्र’ नाहीत!
“आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण २२ जानेवारीला अनुभवणार”
कुस्तीगीरांचे पुन्हा आंदोलन पण यावेळी कुस्तीगीरांच्याच विरोधात!
‘तिचा मित्र इम्रान (झारखंड) आणि त्याचा मित्र शोएब यांनी तिच्या वाढदिवशी लॉजमध्ये तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर सकाळी तिला तिच्या कामाच्या ठिकाणी सोडले. त्यानंतर ही मुलगी समुद्रकिनाऱ्यावर गेली असता राजू, हरिश, नागेंद्र आणि गोपी या छायाचित्रकार मित्रांनी तिचे मानसिकदृष्ट्या धीर देण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत तिला लॉजवर नेले आणि तिच्यावर बलात्कार केला,’ अशी माहिती पोलिसांनी दिली.
तर, श्रीनू, अशोक, नरेश, थंबी, ईश्वर आणि प्रवीण हेदेखील त्यांच्यात सामील झाले आणि त्यांनी तिच्यावर २२ डिसेंबरपर्यंत बलात्कार केला. त्यानंतर २३ डिसेंबर रोजी एका आरोपीने तिला २०० रुपये देऊन ओडिशातील पोलिस ठाण्याजवळ सोडले. त्यानंतर तेथील पोलिसांनी तिच्या पालकांना कळवले. पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून झारखंडसह विशाखापट्टणम येथील विविध ठिकाणांवरून ११ आरोपींना अटक केली आहे. तर, महिलांची सुरक्षा करण्यात राज्य सरकार अपयशी ठरत असल्याची टीका काँग्रेस आणि तेलुगु देसम पक्षांनी केली आहे.