जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनाजवळ स्फोट झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर दुसरीकडे, कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि लष्कराच्या जवानांची दहशतवाद्यांशी चकमक सुरू असून, यामध्ये आतापर्यंत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले आहे.
बांदीपोरामध्ये भारतीय लष्कराच्या वाहनाजवळ मोठा स्फोट घडवून आणल्याची घटना घडली आहे. हे वाहन अलुसा परिसरातून जात असताना हा स्फोट झाला. या स्फोटात कोणतीही हानी झाली नसून लष्कराने शोधमोहीम हाती घेतली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
कुलगाममध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा
काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात गुरुवार, २७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत आतापर्यंत एक दहशतवादी ठार झाला आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी तैनात करण्यात आले असून परिसरात शोध मोहीम सुरू आहे.
बुधवार, २६ ऑक्टोबर रोजी बारामुल्ला परिसरातही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान आणि एक दहशतवादी जखमी झाले आहेत. या परिसरातही सुरक्षा दलाची शोध मोहीम सुरू आहे.
या चकमकींदरम्यान लष्कराच्या वाहनाजवळ झालेल्या स्फोटामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक अलर्ट मोडवर आल्या आहेत. त्यामुळे आता दहशतवाद्यांविरोधात कठोर शोध मोहीम राबविण्यात येत आहे.