राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शुक्रवार, ९ जून रोजी सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी धमकी देणाऱ्या एका आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने रविवार, ११ जून रोजी अटक केली आहे. सागर बर्वे (वय ३४) असे या आरोपीचे नाव आहे. सागर बर्वे याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. संबधित प्रकरणात आरोपीला स्थानिक न्यायालयाने १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शरद पवारांना धमकी दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ दखल घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. तांत्रिक बाबींचा आधार घेत पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. आरोपी सागर बर्वे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असून त्यानेच दोन्ही अकाउंट तयार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला स्थानिक न्यायालयात हजर केलं. त्यानंतर १३ जून पर्यंत सागर याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
एका सोशल मीडिया अकाऊंटवरून ट्विटरवर शरद पवारांना धमकी देण्यात आली होती. ‘तुमचाही दाभोलकर होणार,’ असं लिहून धमकी देण्यात आली. तसेच, शरद पवारांना अश्लाघ्य भाषेत शिवीगाळही करण्यात आली.
हे ही वाचा:
मुंबईत पावसाची हजेरी, राज्यात येलो अलर्ट जारी
इंडिगो एअरलाइन्सचे विमान भरकटून पाकिस्तानमध्ये पोहचले
गेमिंग ऍप धर्मांतरण प्रकरणी फरार शाहनवाजला पकडले
सतत रडणे,गप्प गप्प राहणे; ओडिशा अपघातातील जखमी मनोविकाराने ग्रस्त
शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक झाली होती. राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रीया सुळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट देखील घेतली होती. शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती. भविष्यात काही बरं वाईट झाल्यास त्याला जबाबदार देशाचे आणि राज्याचे गृहमंत्री आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.