पुण्यात महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई सुरू होती. मात्र, चिडलेल्या कार चालकाने पोलिसांवर हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संजय साळवे याला अटक केली आहे. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
पुण्यातील फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात घडत आलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना वरिष्ठांकडून रात्रीच्या वेळी बंदोबस्त लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, रात्रीच्या वेळी जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना थांबून त्यांची तपासणी देखील करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आलेल्या आहेत. अशीच नाकाबंदी फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर सुरू होती. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या महिला पोलिसांनी एका गाडीला थांबवलं, गाडीची तपासणी केली. त्यावेळी ड्रायवर मद्यधुंद अवस्थेत असल्याचं आढळून आलं. या प्रकरणात कारवाई सुरू असतानाच संतप्त कार चालकाने महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा:
‘सनातन’वरील पुस्तक शुभशकून ठरला!
तामिळनाडू बसपाच्या प्रदेशाध्यक्षांची धारदार शस्त्राने हत्या
जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकरांना क्लीनचीट
जाग हिन्दू बांधवा प्राण संकटी तरी …
यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतलं. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची माहिती मिळत आहे. आरोपी संजय फकिरा साळवे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपीनं दारू पिऊन हे धक्कादायक कृत्य केलं असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.