बिहारमधील नीट पेपर लीक प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्रीय तपास संस्थेने म्हणजेच सीबीआयने या प्रकरणाचा कथित मुख्य सूत्रधार राकेश रंजन उर्फ रॉकी याला अटक केली आहे. त्याला बिहारच्या पाटणा येथून अटक करण्यात आली आहे. तसेच न्यायालयाने रंजनला १० दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.
केंद्रीय तपास संस्थेने गुरुवार, ११ जुलै रोजी बिहार नीट- युजी प्रकरणातील कथित सूत्रधाराला पाटणा येथून अटक केली आहे. कथित मुख्य सूत्रधार राकेश रंजन उर्फ रॉकी याच्या अटकेनंतर, तपास संस्थेने त्याच्याशी संबंधित पाटणा आणि कोलकाता येथील विविध ठिकाणी शोध मोहीम राबवली होती. यादरम्यान, अनके कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, स्थानिक न्यायालयाने मुख्य आरोपीला चौकशीसाठी १० दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.
हे ही वाचा:
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईची दमदाटी!
इमिग्रेशन एजंटच्या अटकेमुळे अमेरिकेला जाणाऱ्या मार्ग उघड
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नितेश राणे पुरावा सादर करणार; पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले
‘भारताने जगाला युद्ध नाहीतर बुद्ध दिला’
राकेश रंजन उर्फ रॉकी हा रांचीमध्ये हॉटेल चालवतो. पेपर फुटल्यानंतर रॉकीने पेपर सोडवण्यासाठी सॉल्व्हर्सची व्यवस्था केली होती. रांची आणि पाटणा येथील एमबीबीएस विद्यार्थ्यांचा वापर सॉल्व्हर म्हणून केला जात असे. अमन सिंगच्या अटकेनंतर सीबीआयने रॉकीला अटक केली. अमनला सीबीआयने झारखंडच्या धनबाद येथून अटक केली.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सीबीआयने आतापर्यंत बिहार नीट- युजी पेपर लीक प्रकरणात नऊ जणांना, लातूर, गोध्रा येथून कथित फेरफार प्रकरणी प्रत्येकी एकाला आणि डेहराडूनमधून एकाला अटक केली आहे.