मैत्रिणीला कॉकपिटमध्ये बोलावणारा वैमानिक निलंबित; ३० लाखांचा दंड

नियामकाने एअरलाइनला मैत्रिणीविरोधात प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

मैत्रिणीला कॉकपिटमध्ये बोलावणारा वैमानिक निलंबित; ३० लाखांचा दंड

मैत्रिणीला कॉकपिटमध्ये आमंत्रित करणाऱ्या एअर इंडियाच्या वैमानिकाला निलंबित करण्यात आले आहे. तर, सुरक्षेसारख्या संवेदनशील समस्येकडे त्वरित आणि प्रभावीपणे लक्ष न दिल्याने एअर इंडिया विमान कंपनीलाही ३० लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. विमान वाहतूक नियामकाने ही माहिती दिली.

ही घटना दिल्ली-दुबई विमानप्रवासादरम्यान घडली. एअर इंडियाच्या वैमनिकाने त्याच्या मैत्रिणीला कॉकपिटमध्ये बोलावले आणि तिला तेथे दारू आणि काही खाद्यपदार्थही दिले, असा आरोप केबिन क्रूने केला होता. या संदर्भात विमानाच्या क्रूने एअर इंडियो सीईओ कॅम्पबेल विल्सन यांना पत्रही लिहिले होते. तथापि, हे सुरक्षानियमांचे उल्लंघन असूनही कंपनीने कोणतीही कारवाई केली नाही, असा दावा विमान वाहतूक आयोगाने केला आहे.

तक्रारदाराने या प्रकरणात मार्चच्या सुरुवातीला सीईओला पत्र लिहिले होते, परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी हवाई वाहतूक नियामकाशी संपर्क साधला होता. नियामकाने, पुराव्यांची पडताळणी करून ही कारवाई केली. तसेच, या वैमानिकाला नियमांचे उल्लंघन करण्यापासून न रोखल्याने सह-वैमानिकालाही नियामकाने इशारा दिला होता. ही महिला एअर इंडियाची कर्मचारी होती. तसेच, ती त्या दिवशी या विमानातून प्रवासी म्हणून प्रवास करत होती, असे नियामकाला तपासात आढळून आले. त्यानंतर नियामकाने एअरलाइनला तिच्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या महिलेला विशिष्ट कालावधीसाठी कंपनीच्या कोणत्याही व्यवस्थापकीय कार्यातून दूर करावे लागेल.

हे ही वाचा:

खगोल भौतिकशास्त्रज्ञ जयंत नारळीकरांना जीवनरगौरव पुरस्कार

‘स्टारबक्स’च्या त्या नव्या जाहिरातीने ओढवला वाद; बहिष्कार ट्रेंडिंगमध्ये

फक्त राजीनामा नाही, ही चूक सुद्धा उद्धवना भोवणार!

ट्रक चालकाला जाब विचारण्यासाठी गेलेल्या व्यापाऱ्याच्या अंगावर चढवला ट्रक

सदर पायलटचा परवानाही निलंबित करण्यात आला आहे. तीन महिन्यांसाठी हा परवाना या पायलटला मिळणार नाही. विमानासंदर्भात नागरी विमानसेवा महासंचालकांच्या नियमावलीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.   एअर इंडियाने यासंदर्भात म्हटले आहे की, आम्ही नागरी उड्डाण महासंचालकांचा निर्णय मान्य करतो. पण आम्ही यासंदर्भात कोणतीही कारवाई केली नाही, हे आम्हाला मान्य नाही. जेव्हा या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली तेव्हा आम्ही त्वरित कारवाई केली.

Exit mobile version