पुण्यातील अपघात प्रकरणी रोज नव्याने खुलासे होत असून प्रकरणाला वेगळेच वळण मिळत आहे. पोर्शे कारखाली दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी अग्रवाल कुटुंबाकडून जबरदस्त प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. हे प्रयत्न हाणून पाडण्यात पोलिसांना यश येत असून यामुळे अग्रवाल कुटुंबाचे पाय आणखी खोलात जात असताना दिसत आहेत. अल्पवयीन आरोपी वेदांतचे वडील विशाल आणि आजोबा सुरेंद्र यांनी या प्रकरणात चालकावर खोटी जबानी देण्यासाठी दबाव आणल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली आहे. या घटनेची संपूर्ण माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.
अमितेश कुमार यांनी सांगितले की, “चालक म्हणजेच गंगाराम पुजारी हा आपल्या घरी जात असताना सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी त्याला आपल्या गाडीत बसवून घरी नेले. त्यानंतर त्यांनी गंगाराम पुजारी याच्याकडून त्याचा मोबाईल काढून घेतला आणि त्याला घरातील एका खोलीत डांबून ठेवले. शिवाय त्याला धमकावले की, कुठेही जायचे नाही, कोणाशीही बोलायचे नाही. सांगतो तोच जबाब पोलिसांना द्यायचा, असा दबाव अग्रवाल कुटुंबीयांनी चालकावर आणला होता. हा गुन्हा अंगावर घेतल्यास आम्ही तुला गिफ्ट देऊ, असे सांगून अग्रवाल यांनी गंगाराम पुजारीला आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला. यानंतरही त्याने ऐकले नाही तेव्हा त्यांनी चालकाला धमकावले,” अशी माहिती अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विशाल अग्रवाल आणि सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी गंगारामला घरात डांबून ठेवून त्याचा मोबाईल फोन काढून घेतल्यामुळे घरच्यांशी संपर्क होऊ शकला नव्हता. नवरा घरी आला नाही म्हणून दुसऱ्या दिवशी गंगाराम पुजारीची बायको नातेवाईकांना घेऊन अग्रवाल कुटुंबीयांच्या घरी पोहोचली. तेव्हा अग्रवाल कुटुंबीयांनी गंगारामला सोडण्यास नकार दिला. त्यामुळे त्याच्या पत्नीने आरडाओरडा केला. त्यामुळे अग्रवाल कुटुंबाने गंगारामला सोडले.
त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी करुन सुरेंद्रकुमार अग्रवाल यांच्यावर कलम ३४२, कलम ३६५ आणि कलम ३६८ अंतर्गत अपहरण, दमदाटी आणि डांबून ठेवण्याचा गु्न्हा दाखल केला. यानंतर सुरेंद्र अग्रवालला याला पहाटे अटक केली. विशाल अग्रवाल याच्यावरही या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हे ही वाचा:
अनसूया सेनगुप्ताने रचला इतिहास, कान्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय!
पोर्शे अपघाताची माहिती वरिष्ठांना वेळेत न दिल्याने पुण्यातील दोन पोलिसांचे निलंबन!
‘नवीन पटनायक यांना व्हीके पांडियन यांनी ओलिस ठेवले आहे’
केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाचे थैमान; जनजीवन विस्कळीत
अपघात झाला त्यावेळी पोर्शे कार माझा मुलगा नव्हे तर ड्रायव्हर चालवत होता, असा दावा विशाल अग्रवाल यांनी न्यायालयात केला होता. मात्र, अपघाताच्या वेळी गाडी विशाल अग्रवाल यांचा मुलगाच चालवत होता, अशी कबुली ड्रायव्हरने दिली आहे. तसेच दबाव टाकल्याची कबुलीही त्याने दिली.