राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागानुसार, सन २००८मध्ये नवी दिल्लीत महिलांविरोधात झालेल्या गुन्ह्यांची संख्या तीन हजार ५१५ होती. तर, गेल्या वर्षी ती १३ हजार ९८८पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये महिलांविरोधातील गुन्ह्यांत दिवसेंदिवस वाढच होत असल्याचे दिसून येत आहे.
सन २०००चा तो दिवस होता. एके रात्री दिल्लीच्या निझामुद्दीन कॉलनीजवळ विद्या शहा यांच्या गाडीचा पाठलाग चौघेजण त्यांच्या गाडीतून करत होते. कितीही वेग वाढवला तरी फायदा होत नव्हता. अखेर तेव्हा ३० वर्षांच्या असणाऱ्या विद्या यांनी जांगपुरा येथे अनपेक्षित वळण घेतले. सन २००८मध्ये जेव्हा त्यांनी २५ वर्षीय सौम्या विश्वनाथन हिची दक्षिण दिल्लीतील नेल्सन मंडेला मार्ग येथे तिच्या गाडीमध्येच हल्ला झाल्याचे वृत्त वाचले तेव्हा त्यांना त्यांच्यावर आठ वर्षांपूर्वी गुदरलेल्या प्रसंगाची आठवण झाली. ‘मला माझ्यावर ओढवलेल्या प्रसंगाची आठवण झाली आणि सौम्या कोणत्या प्रसंगातून गेली असेल, याची पुरेपूर कल्पना आली,’ असे विद्या सांगतात.
हे ही वाचा:
शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना गाझाला पाठवावे!
एकनाथ खडसे आणि कुटुंबियांना १३७ कोटींच्या दंडाची नोटीस
बायडन आणि नेतान्याहू यांची भेट; हमासवर साधला निशाणा
ऑलिम्पिकमधील क्रिकेटच्या कार्यक्रमावर २०२५पर्यंत शिक्कामोर्तब!
गेल्या १५ वर्षांत महिलांवरी गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. पोलिसांकडून होणारी जनजागृती आणि त्यांच्याकडून गुन्हे दाखल करण्यास मिळणारे प्रोत्साहन याचाही परिणाम होत आहे. मात्र दिल्ली सुरक्षित आहे का? सुमारे दोन कोटी लोकसंख्या असलेले दिल्ली शहर ‘गुन्ह्यांची राजधानी’ आणि ‘बलात्काराची राजधानी’ म्हणून ओळखले जाते. सन २०१२मध्ये झालेल्या दिल्लीतील सामूहिक बलात्काराने अवघा देश हादरला होता. तत्पूर्वी सन १९९६मध्ये कायद्याचे शिक्षण घेणारी प्रियदर्शिनी मट्टू हिच्यावर तिच्याच घऱात बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती.
सन १९९९मध्ये जेसिका लाल हिची मेहरौली येथील पार्टीत मनू शर्मा याने हत्या केली होती. तिने मद्य देण्यास नकार दिल्याने त्याने तिच्यावर गोळी झाडली होती. तर, २००२मध्ये आयटीओजवळील खुनी दरवाजा येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार झाला होता. तर, नकार पचवू न शकलेल्या एका नराधमाने सन २००५मध्ये लक्ष्मी अग्रवालच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकले होते. सन २००८मध्ये लुटीच्या प्रयत्नात चौघांनी विश्वनाथनवर गोळी झाडून तिला ठार केले होते. तब्बल १५ वर्षांनंतर दिल्ली न्यायालयाने या चारही जणांना दोषी ठरवले. ‘आम्ही तर आमची मुलगी गमावली. मात्र हा इतरांसाठी धडा असेल,’ अशी प्रतिक्रिया सौम्या हिच्या आईने दिली आहे.