पश्चिम बंगालमधील संदेशखालीतील महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि जमीन बळकावल्याच्या प्रकरणात गुरुवारी अटक झालेला तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शहाजहान याच्यावर याआधीही अनेक गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यात भाजपच्या तीन समर्थकांची हत्या आणि पश्चिम बंगालमधील वीजपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना केलल्या मारहाणीचाही समावेश आहे. मात्र यातील अनेक गुन्ह्यांमध्ये एकतर आरोपपत्रच उपलब्ध नाही किंवा शहाजहानविरुद्ध चौकशीच केली नसल्याचे आढळले आहे. अनेक गुन्हे दाखल असूनही प्रशासनाने त्याच्यावर कशी कारवाई केली नाही, याचे धक्कादायक पुरावेच ‘इंडिया टुडे’च्या हाती लागले आहेत.
शेख शहाजहान याच्या खटल्यांची सुनावणी त्वरित घ्यावी, अशी मागणी त्याच्या वकिलाने केली होती, मात्र कोलकाता उच्च न्यायालयाने ती फेटाळून लावली. ‘शेख शहाजहान याच्याविरोधात ४३ खटले दाखल आहेत. पुढील १० वर्षांत हा माणूस तुम्हाला व्यग्र ठेवणार आहे. तुम्हाला किमान १० वर्षे तरी हे खटले लढवावे लागतील,’ असे मुख्य न्यायाधीशांनी शहाजहान याच्या वकिलाला सांगितले.
जून २०१९मध्ये देबदास मोंडल, त्याचे वडील प्रदीप मोंडल आणि सुकांता मोंडल या भाजप समर्थकांच्या हत्येप्रकरणी शहाजहान आणि अन्य २४ जणांविरोधात नझात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. शहाजहान याच्या नेतृत्वाखाली १५० जणांच्या सशस्त्र जमावाने मंडल यांच्या घरात घुसून फर्निचरची नासधूस केली होती आणि ते घर पेटवून देण्यात आले होते. जेव्हा देबदास मंडल पळून जाण्याच्या प्रयत्नात होता, तेव्हा त्याला पकडून नेण्यात आले. दोन वर्षांनी त्याचा मृतदेह त्याच परिसरातील नदीच्या किनारी सापडला. तर, आणखी एका जमावाने सुकांता मोंडल याच्या दुकानात घुसून त्याची हत्या केली होती. या खटल्याचे आरोपपत्रच उपलब्ध नाही. तसेच, शेख शहाजहाविरोधात दाखल केलेला तत्काळ गुन्ह्याची नोंदही रद्द करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
विधानसभेत विरोधकांवर मुख्यमंत्री शिंदेंची जोरदार टोलेबाजी
मदतीच्या प्रतीक्षेत जमलेल्या १०४ पॅलिस्टिनींचा चेंगराचेंगरीत मृत्यू
१२ हजारांचा फायदा झाला म्हणून पैसे गुंतवले आणि फसला…
स्वामी समर्थतर्फे व्यावसायिक कबड्डी ५ मार्चपासून
तसेच, या प्रकरणी पोलिसांनी कोणत्याही वस्तू जप्त केल्या नसून शेख याची साधी चौकशीही आतापर्यंत करण्यात आली नसल्याचे उघड झाले आहे. तसेच, शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्याप्रकरणीही शहाजहान याच्या विरोधातील तपास प्रलंबित आहे. एफआयआरमध्ये नोंद असलेल्या २३ जणांपैकी केवळ सहा आरोपींवरच गुन्हा दाखल आहे. तर, ऑगस्ट २०२२मध्ये राज्य वीजपुरवठा कंपनीच्या कार्यालयात खुसून तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणीही शेख जहांविरोधात गुन्हा दाखल आहे.
या प्रकरणी १५ ऑक्टोबर, २०२२ रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. तसेच, न्यायालयानेही वॉरंट जारी केले होते. मात्र पुढे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. जादा वीजबिल आल्याच्या निषेधार्थ शहाजहान याच्या नेतृत्वाखालील ७०० जणांच्या जमावाने बसंती महामार्ग रोखला होता. तेव्हा हिंसक झालेल्या जमावाचा पोलिसांशी संघर्ष झाला होता आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली होती. काही पोलिसांनाही यात मारहाण करण्यात आली होती. मात्र या प्रकरणातही पुढे काहीच कारवाई झाली नाही.