श्रद्धा वालकरची आपण हत्या केली होती आणि तिच्या शरीराचे तुकडे करून आपण इतस्ततः फेकून दिल्याची कबुली या निर्घृण हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावालाने दिली आहे. त्याने श्रद्धाच्या शरीराच्या हाडांची पावडर करून ती फेकून दिल्याचेही आपल्या कबुलीजबाबात म्हटले आहे.
श्रद्धा वालकरची हत्या केल्यानंतर पुरावे राहू नयेत म्हणून आफताबने अनेक युक्त्या लढवून शरीराचे भाग नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
आफताबने आपल्या कबुलीजबाबात म्हटले आहे की, २८ मार्चला ते मुंबईतून पिकनिकला निघाले. सव्वा महिना बाहेर फिरल्यानंतर ते दिल्लीत एका मित्राकडे राहू लागले. त्यानंतर एक घर त्यांनी भाड्याने घेतले आणि तिथेच मग आफताबने श्रद्धाची हत्या केली.
हे ही वाचा:
योगी आदित्यनाथ यांचा त्रिपुरात काँग्रेसवर हल्लाबोल
राहुल गांधी यांचा आटापीटा; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी संबंध जोडण्याचा प्रयत्न
राहुल गांधी यांची संसदेत पोस्टरबाजी
आफताबने आपल्या कबुलीजबाबात म्हटले आहे की, श्रद्धाशी त्याचे वारंवार वाद होत असत. प्रारंभी हरिद्वार, ऋषिकेश, डेहराडून, मसुरी, मनाली व चंदीगडला ते दोघे गेले. तिथे त्यांची ओळख बद्री नावाच्या मुलाशी झाली. मग त्याच्या घरी ते दिल्लीत राहू लागले. मात्र तिथे होत असलेल्या सततच्या भांडणांमुळे बद्रीने त्या दोघांना घराबाहेर काढले. शेवटी मग त्यांना १५ मे २०२२ला ब्रोकरच्या माध्यमातून दिल्लीच्या छत्तरपूरमध्ये एक घर भाड्याने घेतले.पण यादरम्यान दोघांनाही नोकरी नव्हती. त्यामुळे आर्थिक अडचणी येत होत्या. तेव्हा श्रद्धाने आफताबला आपल्या वसईच्या घरातून सामान आणण्यासाठी सांगितले. पण तब्येत ठीक नसल्याचे कारण देत आफताबने ते काम टाळले. तेव्हा श्रद्धाला राग आला.
अशा सततच्या भांडणांना कंटाळून त्यातून सुटका मिळविण्यासाठी श्रद्धाची आपण हत्या केल्याचे आफताबने कबुली जबाबात म्हटले आहे. तिला जमिनीवर पाडून तिचा गळा दाबून तिला मारले आणि तिचे शरीर प्रथम बाथरुममध्ये ठेवले. नंतर तिच्या शरीराचे धारदार शस्त्राने तुकडे केले. त्यासाठी घेतलेल्या धारदार चाकूने त्यालाही जखम झाली होती पण शेजारी असलेल्या डॉक्टरकडून त्याने त्या जखमेला टाके घालून घेतले.
श्रद्धाच्या शरीराचे अनेक तुकडे त्याने जंगलात जाऊन जाळले तसेच हाडांची पावडर करून ती रस्त्यांवर फेकून दिली.त्याच्या या कबुली जबाबामुळे या प्रकरणातील आफताबची विकृती अधिक स्पष्ट झाली आहे.