एकीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर उद्धव ठाकरे गटाला धक्का बसलेला असताना युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांना झटका बसला आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सूरज चव्हाण यांना ईडीने अटक केली आहे. खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या या खिचडी घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांनी वरळी येथे महापत्रकार परिषदेचे आयोजन केले होते, त्यावेळी सूरज चव्हाण तिथे उपस्थित होते. याआधीही चव्हाण यांची ईडीने चौकशी केलेली आहे. पण आता त्यांना अटक केल्यामुळे ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे.
मुंबई पोलिसांनी याआधी सूरज चव्हाण यांची चौकशी केली होती. नंतर ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. अनेक तास ही चौकशी करण्यात आली होती. तिथे त्यांचा जबाब नोंदविण्यात आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला मग ईडीकडूनही गुन्हा दाखल करण्यात आला. आता ईडीने त्यांना अटक केली आहे.
आता गुरुवारी सूरज चव्हाणला न्यायालयात हजर केले जाईल. ईडीच्या पीएमएलए कोर्टात त्याला हजर करण्यात येईल तिथे ईडी त्याची कोठडी मागणार आहे. त्यावेळी ईडीकडून कोणता युक्तिवाद केला जातो, हे स्पष्ट होईल.
यासंदर्भात भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी टीका केली आहे. कोविडच्या काळात लॉकडाऊन असताना जो खिचडी घोटाळा झाला त्यात आदित्य ठाकरेंचा फ्रंटमॅन सूरज चव्हाणला अटक झाली आहे. ईडीच्या या कारवाईचे स्वागत. उद्धव ठाकरे यांच्या सेनेतील नेत्यांनी ऑक्सिजन खाल्ले, खिचडी खाल्ली, रेमडेसिवीरमध्ये घोटाळा केला आता त्याचा हिशेब उद्धव ठाकरेंना द्यावा लागेल, असे किरीट सोमय्या म्हणाले.
हे ही वाचा:
राम मंदिर उद्घाटनापूर्वी आयएसआयएस संबंधित दहशतवाद्याला उत्तर प्रदेशातून अटक!
श्रीराममंदिराची प्रतिकृती निघाली मुंबई ते न्यू-जर्सी
नरेंद्र मोदींच्या गावात सापडले २८०० वर्षे जुने मानवी वसाहतीचे अवशेष
भारतीय संघासाठी चांगली बातमी! ऋषभ पंतने दिले पुनरागमनाचे संकेत!
यासंदर्भात आदित्य ठाकरे यांचे पूर्वाश्रमीचे निकटवर्तीय अमेय घोले यांनी आनंद व्यक्त केला आहे. सूरज चव्हाण यांची अटक म्हणजे सत्याचा विजय असल्याचे मत घोले यांनी एक्सवर मांडले आहे. चव्हाण यांच्यामुळे घोले यांनी आदित्य ठाकरेंची साथ सोडली होती.
काय आहे खिचडी घोटाळा?
मुंबई महानगरपालिकेतील बॉडी बॅग घोटाळ्याची चर्चा सुरू असताना त्यात आता खिचडी घोटाळाही चर्चेत आहे. मुंबई महानगरपालिकेत १०० कोटींचा खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप आहे. कोरोना काळात गरीब कामगारांसाठी खिचडी पुरविण्याचा निर्णय तत्कालिन मविआ सरकारने घेतला होता. मुंबई महानगरपालिकेने ५२ कंपन्यांना खिचडीचे कंत्राट दिले. यात घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यात सूरज चव्हाणचे नाव समोर आले होते.