‘गुमराह’ चित्रपटाप्रमाणेच अभिनेत्रीला ड्रग्स प्रकरणात अडकवले!

पोलिसांनी केली दोघांना अटक, दुबईत अडकलेल्या अभिनेत्रीला सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू

‘गुमराह’ चित्रपटाप्रमाणेच अभिनेत्रीला ड्रग्स प्रकरणात अडकवले!

कोविड काळात झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी एका बेकरी मालकाने हिंदी चित्रपट आणि वेबसिरीजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीला हॉलिवूडसाठी ऑडिशन देण्याच्या नावाखाली दुबईत पाठवून अमली पदार्थ तस्करीत अडकवल्याची धक्कादायक बाब गुन्हे शाखेच्या तपासात समोर आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने याप्रकरणी सोमवारी बेकरी मालकासह दोघांना अटक केली आहे. संजय दत्त आणि श्रीदेवी अभिनित गुमराह या चित्रपटात श्रीदेवीला जसे ड्रग्स प्रकरणात अडकवले जाते, त्याचाच अनुभव ख्रिसन परेरा या तरुणीला आला.

अँथनी पॉल आणि राजेश बोभाटे या दोघांना याप्रकरणी अटक केली आहे. पॉल हा एका बेकरीचा मालक असून मिरा रोड येथे राहणारा आहे. राजेश उर्फ रवी बोभाटे हा मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे राहणारा असून सध्या वाकोला सांताक्रूझ येथे राहण्यास होता.

बोरिवली पश्चिम येथे राहणारी ख्रिसन परेरा (२७) ही अभिनेत्री असून तिने ‘ सडक २’ ‘बाटला हाऊस’ या हिंदी चित्रपटासह काही हिंदी वेबसिरीज मध्ये काम केले आहे. ख्रिसन परेराला १ एप्रिल रोजी दुबईतील ‘शारजाह’ विमानतळावर ड्रग्स तस्करी प्रकरणात अटक केली आहे. ख्रिसन परेरा हिला शारजाह विमानतळावर एका ट्रॉफीसह ताब्यात घेण्यात आले होते. या ट्रॉफीत शारजाह पोलिसांना अफू आणि गांजा हा अमली पदार्थ सापडले होते.

ख्रिसन परेरा हिला अँथनी पॉल आणि राजेश बोभाटे या दोघांनी हॉलिवूड चित्रपटाच्या ऑडिशनच्या नावाखाली शारजाह येथे पाठवले होते व तिच्याकडे एक ट्रॉफी देण्यात आली होती. ती ट्रॉफी विमानतळावर ख्रिसनला घेण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीला देण्यास सांगण्यात आले होते. परंतु ख्रिसन १ एप्रिल रोजी शारजाह विमानतळावर पोहचली त्यावेळी तिला घेण्यासाठी कोणीही विमानतळावर आले नाही किंवा तिच्या नावाने या ठिकाणी हॉटेलमध्ये खोली बुक करण्यात आलेली नव्हती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ख्रिसनने आपल्या मुंबईत वडिलांना संपर्क साधला आणि फसवणूक झाल्याचे सांगितले.

दरम्यान, ख्रिसनला शारजाह विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेऊन तिच्याजवळ असणारी ट्रॉफी तपासली असता त्यात अमली पदार्थ आढळून आले. शारजाह पोलिसानी ख्रिसनला ड्रग्स तस्करी प्रकरणात अटक केली. मुलीला अटक केल्यानंतर परेरा कुटुंबीयांनी मुंबई पोलिसांकडे संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला, पोलिसांनी हे प्रकरण गंभीरपणे न घेतल्यामुळे अखेर परेरा कुटुंबांनी गुन्हे शाखेच्या अधिकारी यांच्याकडे संपर्क साधला. गुन्हे शाखा कक्ष १०कडे हे प्रकरण तपासासाठी सोपविण्यात आल्यानंतर कक्ष १०च्याने अँथनी पॉल याला संशयावरून ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला.

हे ही वाचा:

मुकेश अंबानींची कर्मचाऱ्याला तब्बल १,५०० कोटी किंमतीच्या घराची भेट

वॉटर मेट्रो म्हणजे जेटी, बस टर्मिनल, मेट्रो नेटवर्क, तीर्थस्थळे यांना जोडणारा प्रकल्प!

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

पाकिस्तानात पोलिस स्टेशनवर आत्मघाती हल्ला, १२ पोलिस ठार, ४० जखमी

ख्रिसनची आई प्रमिला परेरा यांच्यासोबत झालेल्या वादातून तसेच सर्वांसमोर केलेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी त्याने प्रमिला यांची अभिनेत्री मुलगी ख्रिसनला अमली पदार्थच्या जाळ्यात अडकविण्यासाठी सहकारी राजेश बोभाटे यांच्या मदतीने हा कट आखला होता, अशी माहिती समोर आली. गुन्हे शाखेने वाकोला पोलीस ठाण्यात अँथनी पॉल आणि राजेश बोभाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

शारजाह पोलिसांनी अटक केलेल्या ख्रिसन ही निर्दोष असून तिला अडकविण्यात आले असल्याचे सिद्ध करण्यासाठी कायदेशीर मदत केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.

Exit mobile version