बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी हिच्या वडिलांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पाच जणांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. सेवानिवृत्त डेप्युटी एसपी आणि दिशा पाटनीचे वडील जगदीश सिंग पाटनी यांनी असा आरोप केला आहे की, सरकारी आयोगात उच्च पद देण्याचे आश्वासन देत पाच जणांनी त्यांची २५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी शुक्रवारी संध्याकाळी बरेली कोतवाली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला.
उत्तर प्रदेशमध्ये पाच जणांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे. कोतवाली पोलीस स्टेशनचे प्रभारी डीके शर्मा यांनी सांगितले की, “शिवेंद्र प्रताप सिंह, दिवाकर गर्ग, जुना आखाड्याचे आचार्य जयप्रकाश, प्रीती गर्ग आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणूक, गुन्हेगारी धमकी आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.” पोलिसांकडून आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
तक्रारीनुसार, उत्तर प्रदेशातील बरेली येथील रहिवासी जगदीश पाटनी यांनी आरोप केला आहे की, शिवेंद्र प्रताप सिंह या ओळखीच्या व्यक्तीने त्यांची ओळख दिवाकर गर्ग आणि आचार्य जयप्रकाश यांच्याशी करून दिली. आरोपींनी त्यांचे चांगले राजकीय संबंध असल्याचा दावा केला आणि पाटनी यांना सरकारी आयोगामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा अन्य प्रतिष्ठित पद देण्याचे आश्वासन दिले. पाटनी यांचा विश्वास संपादन केल्यानंतर, या लोकांनी त्यांच्याकडून २५ लाख रुपये घेतले. पाच लाख रुपये रोख आणि २० लाख रुपये तीन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करून घेतले. तीन महिन्यांत समोरून काहीही प्रतिसाद न आल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पाटनी यांनी पैसे परत मागितल्यावर त्यांनी धमक्या दिल्या आणि आक्रमक वर्तन केले, असे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा :
सरसंघचालक मोहन भागवत, इस्रो प्रमुख सोमनाथ यांच्याकडून ‘सनातन’चे कौतुक!
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड लखवी पाकिस्तानातला ‘व्हीआयपी’
व्होट जिहादसाठी आवाहन करणाऱ्या सज्जाद नोमानी यांच्याविरोधात तक्रार
जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणाची फाईल बंद! रवींद्र वायकरांना दिलासा
पाटनी यांनी पुढे असा दावा केला की, त्यांच्या राजकीय संबंधांच्या खोट्या दाव्यांना बळकटी देण्यासाठी या आरोपींनी हिमांशू नावाचा ‘विशेष कर्तव्य अधिकारी’ म्हणून ओळख करून देऊन त्यांची दिशाभूल केली. फसवणुकीचा संशय आल्याने पाटनी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसून, त्यांना पकडण्यासाठी आणि कठोर कारवाई करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.