बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सैफ अली खान याच्या घरात शिरलेल्या चोराकडून त्याच्यावर चाकू हल्ला झाल्याची माहिती आहे. सध्या सैफ याला मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे
सैफ अली खान याच्या घरी गुरुवारी पहाटे एका अज्ञात व्यक्तीने त्याच्या वांद्रे येथील घरात शिरून लुटमार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत चोराने सैफ याच्यावर चाकूने वार केले. हल्ल्यानंतर तातडीने सैफला मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सैफ अली खानच्या घरात घुसला आणि दोघांमध्ये भांडण झाले ज्यामध्ये अभिनेत्यावर चाकूने वार करण्यात आला. घटनेच्या वेळी अभिनेत्याचे काही कुटुंबीय घरात उपस्थित होते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
प्रकरण काय?
रात्री अडीचच्या सुमारास सैफच्या घरात हा प्रकार घडला. चोराला पाहून सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांनी आरडाओरड सुरू केला. तसेच त्यांच्यात वादही झाला. त्यावेळी सैफ अली खानला जाग आली. खोलीतून बाहेर आल्यानंतर सैफ अली खान आणि चोर आमनेसामने आले. यावेळी चोरानं पकडलं जाण्याच्या भीतीनं त्याच्याकडील चाकूने सैफ अली खानवर वार केले. यामध्ये सैफ अली खानला दुखापत झाली. त्याला तातडीनं मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या गोंधळात चोरानं पळ काढला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा:
आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा…मोदींनी महायुतीच्या आमदारांना दिला कानमंत्र!
चुकीच्या दाव्यानंतर ‘मेटा’कुटीला येत मागितली भारताची माफी
छत्रपती शिवरायांनी नौसेनेला ‘नवे सामर्थ्य, व्हिजन दिले’
जसप्रीत बुमराह ठरला आयसीसीचा ‘प्लेअर ऑफ द मंथ डिसेंबर २०२४’
पोलिसांना हल्ल्याची माहिती मिळताच, त्यांनी सैफच्या घरी धाव घेत तात्काळ चौकशी सुरू केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. सैफच्या आसपासच्या परिसरात दोन ते तीन सीसीटीव्ही आहे. गेटवरही सीसीटीव्ही आहेत. पोलिसांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे चोराचा माग घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्याच्या घरातील दोन ते तीन कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यातही घेण्यात आले आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. मात्र, अद्याप सैफ अली खानच्या कुटुंबियांकडून कोणत्याही प्रकारची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.