कृषि कायदे मागे घेण्यासाठी झालेल्या आंदोलनात सहभागी झालेला पंजाबचा अभिनेता दीप सिद्धूचा मंगळवारी अपघाती मृत्यू झाला. दिल्लीत प्रजासत्ताक दिनी झालेल्या दंगलीसंदर्भात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर तो जामिनावर होता. मात्र कुंडली-मनेसार-पालवाल एक्स्प्रेसवेवर त्याच्या गाडीला अपघात झाला. त्यात त्याचा मृत्यू झाला.
तो ज्या महिंद्रा स्कॉर्पिओने प्रवास करत होता, ती गाडी एका ट्रेलरवर मागून आदळली आणि त्यात तो ठार झाला. दिल्ली ते भटिंडा असा तो प्रवास करत होता. मंगळवारी रात्री ९.३० वाजता त्याची गाडी ट्रेलरवर आदळली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
जखमी झालेल्या दीप सिद्धूला हॉस्पिटलला नेण्यात आले पण तिथे आणल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात दीप सिद्धूला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी जी ट्रॅक्टर रॅली लाल किल्ल्याच्या दिशेने काढली होती, त्यासंदर्भात त्याला पोलिसांनी पकडले होते. लाल किल्ला परिसरात हे आंदोलनकर्ते आले आणि त्यांनी पोलिसांना मारहाण केली.
मोदी सरकारने केलेल्या तीन कृषि कायद्यांना विरोध करण्यात येत होता. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान मोदींनी हे कायदे मागे घेतले.
हे ही वाचा:
संजय राऊत यांचा ‘साडे तीन’ चा फ्लॉप शो…
मोहित कंबोज म्हणतात, म्हणून संजय राऊत यांना घाम फुटला!
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार?
गोरेगाव येथील रस्त्याला सहकारश्री शिवाजीराव शिंदे यांचे नाव देऊन गौरव
एप्रिल महिन्यात दीप सिद्धूला जामीन मिळाला पण बाहेर आल्यावर लगेच त्याला अटक केली गेली. पुन्हा एप्रिलच्या अखेरीस त्याला जामीन मिळाला आणि त्याची सुटका झाली. दिल्ली पोलिस जेव्हा त्याला बोलावतील त्यावेळी त्याला हजर राहावे लागेल या अटीवर त्याला जामीन मंजूर झाला होता. लाल किल्ला परिसरात झालेल्या दंगलीच्या कारस्थानात त्याचा हातभार असल्याचा आरोप त्याच्यावर होता. त्याच्या मृत्युनंतर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.