राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रक्षोभक भाषा वापरून जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली मुंबईतील सांताक्रूझ पोलिसांनी योगेश सावंत या तरुणाला अटक केली आहे. योगेश सावंत याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
याआधी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात प्रक्षोभक भाषा वापरून जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात विरोधात कलम १५३ (अ), ५००, ५०५ (३), ५०६ (२) आणि ३४ अन्वये गुन्हा नोंद केला होता.
योगेश सावंत याच्या मुद्द्यावरून विधानसभेत भाजपा आमदार राम कदम आणि आशिष शेलार यांनी विरोधकांवर निशाणा साधला. भाजपा आमदार राम कदम यांनी योगेश सावंत यांच्या एका सोशल पोस्टचा संदर्भ देत त्यात देवेंद्र फडणवीसांना संपवण्याची भाषा केल्याचा दावा केला. तसेच त्याचे संबंध बारामतीहून असल्याचे ते म्हणाले. शिवाय तिथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना शरद पवार गटाचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार फोन करून योगेश सावंतला सोडायला सांगत होते. काय संबंध आहे रोहित पावरांचा?” असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला.
हे ही वाचा:
“सलीम कुत्तासोबत नाचणाऱ्या बडगुजरांचे संजय राऊत गॉडफादर”
हिमाचल प्रदेशातील काँग्रेसचे सहा आमदार अपात्र!
न्यायाधीशाला योग्य प्रकारे सॅल्युट न करणे भोवले
हिंसाचार करणाऱ्या शेतकऱ्यांचे पासपोर्ट, व्हिसा रद्द करणार
दरम्यान, योगेश सावंत हा रोहित पवार यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येत आहे. रोहित पवार यांनीही हे मान्य केले असून योगेश सावंत कार्यकर्ता असून त्याची चूक काय? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. भाजपाने नाटक करू नये. एका युट्यूब चॅनेलने सामाजिक कार्यकर्त्यांची मुलाखत घेतली ती त्याने त्याच्या सोशल मीडियावर टाकली. आता तुम्ही त्या युट्यूब चॅनेलवर कारवाई करत नाही. ज्याने मुलाखत घेतली त्याच्यावर काही करत नाही. मात्र, या कार्यकर्त्यांवर तुम्ही कारवाई करता असं रोहित पवार म्हणाले.