स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. यावरून शिवसेना नेते आणि शिवसैनिक आक्रमक झाले असून कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल कामराला इशारा देत माफीची मागणी केली आहे. तर, या संपूर्ण वादाचे पडसाद विधानसभेतही उमटले. दुसरीकडे ज्या ठिकाणी हा कार्यक्रम झाला त्या स्टुडिओवरही मुंबई महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे.
मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील खार परिसरातील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट स्टुडिओ येथे तोडफोड मोहीम सुरू केली आहे. याचं ठिकाणी कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवणारा व्हिडिओ शूट केला होता. वादाला तोंड फुटताच सोमवारी सकाळी महापालिकेच्या एका पथकाने हातोड्यांसह या परिसरात प्रवेश केला आणि सध्या आत तोडफोड मोहीम राबवत आहे. नियमांचे उल्लंघन केल्याचे कारण देत कार्यक्रमस्थळाचा काही भाग पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, स्टुडिओचा परिसर हा दोन हॉटेल्समधील अतिक्रमित क्षेत्रात आहे. सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते म्हणाले, “स्टुडिओ मालकाने काही तात्पुरते बेकायदेशीर शेड बांधले आहेत, जे आम्ही आता काढून टाकत आहोत. यासाठी कोणतीही सूचना देण्याची आवश्यकता नाही.” विसपुते यांनी असेही नमूद केले की कोणत्याही बेकायदेशीर गोष्टींसाठी इमारतीच्या आराखड्याची तपासणी केली जात आहे आणि त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिले आहे.
हे ही वाचा..
कामराला समर्थन देणाऱ्या विरोधी बाकावरच्यांनी सुपारी दिली आहे का?
मुंबईतील ऐतिहासिक बंगल्याची २७६ कोटींना विक्री; यापूर्वीही झालेत असेच कोट्यवधींचे व्यवहार
लोकसभेत वित्त विधेयक २०२५ मंजूरीसाठी सार होणार
जनतेने कोण गद्दार आणि कोण खुद्दार दाखवून दिले, कामराने माफी मागावी!
दरम्यान, कुणाल कामरा प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल काही म्हणणे नसून ते स्वैराचाराकडे जाणारे नसावे, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते पुढे म्हणाले की, हास्य, व्यंग याचा पुरस्कार करणारे आपण लोक आहोत. राजकीय व्यंग झालं तरी त्याला दुसरा कुठला रंग देण्याचा प्रयत्न केलेला नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणारे आपण लोक आहोत. पण ते स्वैराचाराकडे जाणारं असेल, तर ते मान्य होणारं नाही,” असं स्पष्ट मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.