‘श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद’ असे लिहिलेल्या प्रसादाची विक्री करून दिशाभूल केल्याप्रकरणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ई-कॉमर्स वेबसाइट ऍमेझॉनला नोटीस पाठवली आहे. याप्रकरणी कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने तक्रार केल्यानंतर केंद्र सरकारच्या या प्राधिकरणाने ही कारवाई केली आहे.
२२ जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नावाने प्रसादाची विक्री करून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप व्यापाऱ्यांच्या या संघटनेने केला आहे. ग्राहक प्राधिकरणाने ऍमेझॉनला याबाबत सात दिवसांत उत्तर मागितले असून तसे न केल्यास ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ अंतर्गत योग्य ती कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. कंपनीनेही या प्रकरणी योग्य ती कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा:
सानिया मिर्झाशी वेगळा झाल्यावर शोएब मलिकचे तिसरे लग्न
कोणी जावो अथवा न जावो, राम मंदिर सोहळ्याला मी जाणार!
अयोध्येतील सोहळ्याचे ‘त्या’ पाच न्यायाधीशांना निमंत्रण
राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी रिलायन्स उद्योगाकडून सुट्टी जाहीर
ऍमेझॉनवर ‘श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद’ लिहिलेल्या अनेक मिठाया, पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे ग्राहक प्राधिकरणाला आढळले आहे. अशाप्रकारे या पदार्थांच्या विक्रीतून ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याचे प्राधिकरणाने नमूद केले आहे. ऍमेझॉनवर ‘श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद-रघुपीत घी लड्डू, अयोध्या राम मंदिर अयोध्या प्रसाद, खोया खोबी लड्डू. राम मंदिर अयोध्या प्रसाद- देसी काऊ मिल्क पेढा’ आदी पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
केंद्रीय प्राधिकरणाने पुढे म्हटले आहे की, अशा पद्धतीमुळे ग्राहकांच्या खरेदीचे निर्णय घेण्यावर चुकीचा प्रभाव पडतो. जर उत्पादनाच्या अचूक गुणधर्मांचा उल्लेख केला असता, तर कदाचित त्यांनी ते पदार्थ घेतलेही नसते.
ऍमेझॉनने याबाबत एक निवेदन जाहीर केले आहे. ‘कंपनी त्यांच्या धोरणांनुसार योग्य ती कारवाई करत आहे. आम्हाला केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून काही विक्रेत्यांच्या दिशाभूल करणाऱ्या उत्पादनांच्या दाव्यांबाबत आणि उल्लंघनांसाठी त्यांची चौकशी करण्याबाबत एक नोटीस प्राप्त झाली आहे. आम्ही आमच्या धोरणांनुसार अशा सूचींविरुद्ध योग्य कारवाई करत आहोत,’ असे ऍमेझॉनच्या प्रवक्त्याने सांगितले.