वाल्मिक कराडचे बँक खाते गोठवले?

९ सीआयडी पथके करणार तपास

वाल्मिक कराडचे बँक खाते गोठवले?

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता सर्वत्र संताप व्यक्त होत असून ज्याच्यावर आरोप करण्यात येत आहे तो वाल्मिक कराड याचे बँक खाते गोठवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून कळते आहे.

वाल्मिक कराड याच्यासह फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्यात आली असून कराडच्या नातेवाईकांचीदेखील बँक खाती गोठवण्यात आली आहेत. वाल्मिक कराड हा लवकरच आत्मसमर्पण करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा:

मौलाना बरेलवी म्हणतात, नवे वर्ष साजरे करणे हा इस्लाममध्ये गुन्हा

संविधान, महाकुंभ, मलेरियाचा पराभव आणि कॅन्सरवर उपचार!

दिल्लीत सापडले ८ बांगलादेशी नागरिक, बांगलादेशला रवानगी!

लडाखमध्ये पँगाँग किनाऱ्याला १४ हजार फुटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा!

संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) ९ पथकं तयार केली आहेत. त्यात १५० पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. स्कॉर्पिओ गाडीत सापडलेले मोबाईल प्रयोगशाळेत पाठवले आहेत. या प्रकरणातील सर्व कॉल, व्हाट्सअप कॉल हे सर्व तपासण्याचं काम सीआयडीकडून सुरु आहे.

सीआयडीची कारवाई

या प्रकरणात १०० पेक्षा जास्त लोकांची चौकशी करण्यात आली आहे. फरार आरोपींच्या संपर्कातील लोकांची कसून चौकशी करण्यात आली आहे. स्कॉर्पिओ गाडीत सापडलेल्या दोन मोबाईलमध्ये काही महत्त्वाचा डेटा आणि व्हिडीओदेखील मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे.

या प्रकरणात देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. पवनचक्कीच्या कंत्राटांवरून हा वाद झाला होता. या प्रकरणात बीडच्या वाल्मिक कराडचे नाव समोर आले. त्याचे महायुतीतील मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंध असल्याचे आरोप केले गेले. भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही मुंडे यांना लक्ष्य केले.

Exit mobile version