२००६ वाराणसी साखळी बॉम्बस्फोटातील आरोपीला फाशी

२००६ वाराणसी साखळी बॉम्बस्फोटातील आरोपीला फाशी

गाझियाबाद न्यायालयाने सोमवार, ६ जून रोजी १६ वर्षे जुन्या वाराणसी साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाचा निकाल दिला आहे. या प्रकरणातील आरोपी मोहम्मद वलीउल्ला याला गाझियाबाद न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. १६ वर्षांपूर्वी वाराणसी येथे साखळी बॉम्बस्फोट झाले होते. यामध्ये २० जणांचा मृत्यू झाला होता तर १०० लोक जखमी झाले होते.

वाराणसीतील संकट मोचन मंदिर संकुलात आणि कैंट स्टेशनवर ७ मार्च २००६ रोजी तीन स्फोट घडवण्यात आले होते. या स्फोटांमध्ये २० जणांचा मृत्यू झाला होता तर १०० हून अधिक लोक जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटाप्रकरणी वलीउल्लाह याचा सहभाग असल्याचे तपासात आढळून आले होते. दोषारोप पत्र दाखल करून न्यायालयात त्याच्याविरोधात खटला सुरू होता. यावर निकाल देताना न्यायालयाने वलीउल्लाह याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

हे ही वाचा:

रायगडावर निर्बंधमुक्त शिवराज्याभिषेकाचा अमाप उत्साह

मूसेवाला हत्येप्रकरणी पुण्यातील दोघांच्या मुसक्या आवळल्या

‘ठाकरे सरकारमधील मंत्री टक्केवारी मागतात’

१८ वर्षात नदालला १४ वे फ्रेंच ओपन विजेतेपद

निकालाच्या वेळी  सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात प्रसारमाध्यमांना परवानगी देण्यात आली नव्हती. शिवाय कोर्टात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. दरम्यान, वाराणसीतील बॉम्बस्फोटानंतर वलीउल्लाहच्या बाजूने कोणताही वकील खटला लढण्यास तयार नव्हता. यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे प्रकरण गाझियाबाद न्यायालयात वर्ग करण्यात आले होते. या प्रकरणातील एक दहशतवादी मौलाना झुबेर याचा सीमेवर सुरक्षा दलांनी खात्मा केला आहे.

Exit mobile version