अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याकांडात तुरुंगात असलेल्या आरोपीला गुन्ह्याचा पश्चाताप होत आहे. या आरोपीने विशेष न्यायालयात गुरुवारी याचिका दाखल करून या प्रकरणातील संपूर्ण परिस्थिती, वस्तुस्थिती आणि सत्य सांगण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी एक संधी देण्यात यावी अशी विनंती त्याने न्यायालयाकडे केली आहे.
हा आरोपी म्हणजे पोलिस अधिकारी सुनील माने आहे. विशेष न्यायालयाने माने याच्या अर्जाची दखल घेऊन ८ मार्चपर्यत तपास यंत्रणेने या अर्जावर आपले उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहे.
अँटिलिया आणि हिरेन प्रकरण काय होते …
उद्योगपती मुकेश अंबानी यांचे दक्षिण मुंबईतील अँटिलिया या निवासस्थान जवळ २५ फेब्रुवारी २०२१रोजी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ ही मोटार आढळून आली होती, या मोटारीत स्फोटकासह मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांना धमकीचे पत्र देखील आढळून आले होते. या प्रकरणाचा तपास सुरू असताना ५ मार्च रोजी मुंब्रा खाडीत स्कॉर्पिओचा मालक आणि ठाण्यातील व्यवसायिक मनसुख हिरेन याचा मृतदेह आढळून आला.
तपासात मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. या सर्व कटात मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाजे पाठोपाठ पोलीस निरीक्षक सुनील माने, निवृत्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा, पोलीस उपनिरीक्षक काझी यांचा समावेश असल्याचे समोर आले. या गुन्ह्याचा तपास केंद्रीय तपास संस्था एनआयए कडे सोपविण्यात आला. एनआयए ने सचिन वाजे, सुनील माने,प्रदीप शर्मा,काझी यांच्यासह ११जणांना अटक केली आहे. हे सर्वजण मागील दोन वर्षांपासून तुरुंगात आहे. मागील दोन वर्षे तुरुंगवासात राहिल्यानंतर बडतर्फ पोलीस निरीक्षक सुनील माने यांना केलेल्या कृत्याचा पश्चाताप होत आहे.
मानेने केलेल्या याचिकेत असे म्हटले आहे की,….
“माझ्या तुरुंगवासाच्या दरम्यान मी खोलवर विचार केल्यावर मला माझी चूक कळली आहे, एक पोलीस अधिकारी असल्याने देशातील नागरिकांच्या जीवाचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य होते. पण दुर्दैवाने आणि नकळत माझ्याकडून काही चुका घडल्या आहेत,” “या चुकांचा पश्चात्ताप करण्यासाठी आणि पीडिताला (हिरन) आणि त्याच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी मी या प्रकरणातील संपूर्ण परिस्थिती आणि वस्तुस्थिती पूर्ण आणि सत्य प्रकट करण्याचा निर्णय घेतला आहे,” त्याने न्यायालयाला विनंती केली.
हे ही वाचा:
प्रियकराचे वैफल्य आईच्या जीवावर
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उपयोग ‘राष्ट्रवादी’साठी…केतकी चितळेचा घणाघाती आरोप
तेल गेले .. तूपही जाणार ? मशाल चिन्हही गोत्यात
बीबीसी डॉक्युमेंट्रीवर ब्रिटिश खासदाराने केली टीका
त्याची सेवा रेकॉर्ड विचारात घ्या आणि त्याला फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३०७ अंतर्गत “माफी देऊन त्याच्या चुकांचा पश्चात्ताप करण्याची संधी” द्या असे माने यांनी गुरुवारी दाखल केलेल्या त्यांच्या हस्तलिखित याचिकेत म्हटले आहे. याचिकेत पुढे असे म्हटले आहे की त्यांच्या २६ वर्षांच्या “उत्कृष्ट” सेवेत, माने यांनी अनेक प्रशंसा आणि सुमारे २८० पुरस्कार आणि बक्षिसे मिळवली आहेत. हा अर्ज स्वेच्छेने करण्यात आला होता आणि त्याच्या लिखित संमती शिवाय रेकॉर्डवरील त्याच्या वकिलालाही तो मागे घेण्याची परवानगी देऊ नये, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.विशेष न्यायालयाने माने याच्या याचिकेची दखल घेतली असून ८मार्च पर्यत एनआयए ने आपले उत्तर न्यायालयात दाखल करण्याचे निर्देश दिले आहे.