उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथील मलिहाबाद परिसरात महिलेवर सामुहिक बलात्कार आणि तिची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. दिनेश कुमार द्विवेदी आणि अजय द्विवेदी यांना अटक करण्यात आली होती. परंतु, अजय द्विवेदी घटनास्थळावरून फरार झाला. याचा शोध घेत असताना शनिवारी झालेल्या चकमकीत अजय याचा मृत्यू झाला.
एका ३२ वर्षीय महिलेचे अपहरण, सामूहिक बलात्कार आणि गळा दाबून हत्या करण्यात आली होती. अयोध्येत राहणारी ही महिला वाराणसी येथे नोकरीसाठी मुलाखत द्यायला म्हणून गेली होती. मुलाखतीवरून परतल्यानंतर ती चिनहाट येथील तिच्या भावाच्या घरी जात होती.
तिच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तिने बुधवारी पहाटे आलमबाग येथून एक ऑटोरिक्षा भाड्याने घेतली होती, परंतु रिक्षा चालक तिला मलिहाबादला घेऊन गेला. पोलिस उपायुक्त (डीसीपी)-गुन्हेगार कमलेश कुमार दीक्षित म्हणाले की, “महिलेच्या भावाने बुधवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. तिने तिचे लाईव्ह लोकेशन तिच्या भावासोबत शेअर केले होते आणि ऑटो रिक्षाचालक तिला चुकीच्या मार्गावर घेऊन जात असल्याचा संशय व्यक्त केला होता. जेव्हा तिचे शेवटचे ठिकाण मलिहाबादजवळ होते, तेव्हा तिच्या कुटुंबाने ११२ या आपत्कालीन सेवा क्रमांकावर या समस्येची तक्रार केली, त्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्याने पथके तयार केली आणि महिलेचा शोध सुरू केला. ती मलिहाबादमधील मोहम्मद नगर तालुकदारीजवळील आंब्याच्या बागेत बेशुद्धावस्थेत आढळली,” अशी माहिती पोलिस उपायुक्तांनी दिली.
पोलिसांनी महिलेला तातडीने किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये नेले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी सांगितले की, भारतीय न्याय संहिताच्या संबंधित कलमांखाली अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, कारण प्रथमदर्शनी असे दिसून आले की या गुन्ह्यात अनेक लोकांचा सहभाग होता.
दरम्यान पोलिसांनी दिनेश कुमार द्विवेदी आणि अजय द्विवेदी यांना अटक केली. अजय हा पळून गेला आणि पोलिसांनी त्याच्यावर १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. शुक्रवारी संध्याकाळी पोलिसांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की अजय लखनऊहून पळून जाणार आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी देवम हॉटेलजवळ तपासणी नाका उभारला आणि रात्री ९:३० च्या सुमारास आरोपीला पाहिले.
हे ही वाचा :
औषधी गुणधर्मांनी युक्त ‘जव’… आहारात आणि उपचारातही!
उरी, पुलवामा हल्ल्याचा बदला घेऊन पंतप्रधान मोदींनी भारताला इस्रायल, अमेरिकेच्या यादीत आणले
गेल्या वर्षी अमेरिकेतून २९७ प्राचीन वस्तू भारतात आणल्या…
डीसीपी विश्वजीत श्रीवास्तव यांनी सांगितले की, “मोटारसायकलवरून जाणाऱ्या संशयिताला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याची मोटारसायकल घसरली आणि त्याने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला.” पुढे आरोपीला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले तिथे त्याचा मृत्यू झाला.