बदलापूरमधील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. या घटनेनंतर निषेधार्थ बदलापूरमध्ये मोठे आंदोलन करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी अक्षय शिंदे या मुख्य आरोपी अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यानंतर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
बदलापूरमधील दोन शालेय विद्यार्थिंनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर केले होते. याप्रकरणी आता न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. आरोपी अक्षय शिंदेला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कल्याण न्यायालयातील न्यायाधीश वी ए पत्रावळे यांच्या दालनात ही सुनावणी पार पडली. यावेळी विशेष सरकारी वकील अश्विनी भामरे पाटील यांनी युक्तीवाद केला.
हे ही वाचा :
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचं उपरणं, भाजपकडून टीकेची झोड !
लैंगिक अत्याचार प्रकरणी बदलापूरच्या शाळेला कारणे दाखवा नोटीस
अलिशान कार, कोट्यवधींची घड्याळे जप्त करत मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक
उद्रेकानंतर बदलापूरमध्ये इंटरनेट सेवा बंद; जमावबंदी लागू
पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदेला १७ ऑगस्टला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने २१ ऑगस्टपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर आज पुन्हा आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी कल्याण न्यायालयाने तपासातंर्गत २६ ऑगस्टपर्यंत ही पोलीस कोठडी वाढवली आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला न्यायालयात हजर करण्यापूर्वी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आरोपीला फाशी द्या, अशी मागणी बदलापूरकरांकडून केली जात आहे. एकूणच पालक आणि नागरिकांचा रोष पाहता आरोपीवर हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरासह कल्याण न्यायालयात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.