ईडीने सादर केलेल्या पुराव्यांनुसार अरविंद केजरीवालांची अटक योग्यच

दिल्ली उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

ईडीने सादर केलेल्या पुराव्यांनुसार अरविंद केजरीवालांची अटक योग्यच

कथित दारु घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवालांच्या अटकेला वैध ठरवलं आहे. ईडीकडून केजरीवालांना करण्यात आलेल्या अटकेविरोधात उच्च न्यायलयात आव्हान देण्यात आले होते. मात्र, ईडीचे पुरावे पाहून न्यायालयाने हा निकाल देत अटकेला आव्हान देणारी याचिका फेटाळली आहे.

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने केलेल्या अटकेविरोधात केजरीवालांनी न्यायालयात धाव घेतली होती. अरविंद केजरीवालांची ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली असून अटक वैध असल्याची टिपण्णी केली आहे. न्या. स्वर्ण कांता शर्मा यांनी निर्णय सुनावताना म्हटलं की, हे प्रकरण केंद्र सरकार आणि केजरीवाल यांच्यातील नाही तर ईडी आणि केजरीवाल यांच्यात आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपास यंत्रणांनी त्यांना अटक केली. ईडीकडे असणारे पुरावे पाहता ही अटक वैध आहे. कुणालाही विशेषाधिकार देऊ शकत नाही. तपासातील चौकशीपासून मुख्यमंत्री म्हणून कुठलीही सवलत दिली जाऊ शकत नाही. न्यायाधीश कायद्याने बांधलेले आहेत. राजकारणाशी नाही, असंही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

ईडीने आपल्या युक्तिवादात याचिकाकर्त्याचा या संपूर्ण प्रकरणात सहभाग असल्याचं म्हटलं आहे. अरविंद केजरीवाल यांच्या वतीने त्यांच्या याचिकेत सरकारी साक्षीदारांच्या जबाबावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. यावर टिप्पणी करताना न्यायालयाने म्हटले की, अप्रूवरचं म्हणणं ईडीने लिहिलेले नसून न्यायालयाने लिहिले आहे. जर तुम्ही त्यावर प्रश्न निर्माण करत असाल तर तुम्ही न्यायाधीशांना प्रश्न करत आहात. केजरीवाल यांना साक्षीदारांची उलट तपासणी करण्याचा अधिकार आहे. पण कनिष्ठ न्यायालयात; उच्च न्यायालयात नाही. कोणत्याही व्यक्तीच्या सोयीनुसार तपास करता येत नाही. तपासादरम्यान एजन्सी कोणाच्या तरी घरी जाऊ शकते असं न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा:

प्रेमप्रकरणे, प्रेमविवाहाचे धोके सांगण्यासाठी केरळमध्ये दाखवला ‘द केरळ स्टोरी’

काँग्रेसची गळती कायम ; प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिवसेना प्रवेश

‘अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे, होता आणि राहील’

‘अनिल मसिह यांना विचारू, असे का केले?’

अरविंद केजरीवाल यांना ईडीने २१ मार्च रोजी दीर्घ चौकशीनंतर निवासस्थानातून अटक केली होती. त्यानंतर २२ मार्च रोजी ईडीने न्यायालयात त्यांना सादर केलं. न्यायालयाने केजरीवालांना १ एप्रिलपर्यंत कोठडीत पाठवलं होतं. त्यानंतर १ एप्रिल रोजी न्यायालयाने त्यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले. सध्या अरविंद केजरीवाल हे तिहार जेलमध्ये आहेत.

Exit mobile version