वांद्रे वरळी सी लिंकवर प्राण वाचविणाऱ्या चेतन कदमच्या नशिबी आला दुर्दैवी मृत्यू

विचित्र अपघातात पाच जणांना गमवावे लागले होते प्राण

वांद्रे वरळी सी लिंकवर प्राण वाचविणाऱ्या चेतन कदमच्या नशिबी आला दुर्दैवी मृत्यू

वांद्रे वरळी सीलिंकवर अपघात झाला, आत्महत्या करण्याचा प्रयत्न झाला तर तात्काळ धावून जाणाऱ्या सुरक्षा रक्षकांनाच आपले प्राण गमवावे लागण्याची दुर्दैवी वेळ आली. मंगळवारी रात्री उशिरा एका विचित्र अपघातात या सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला. त्यातील चेतन कदम यांचा मृत्यू अधिक वेदनादायी होता. त्यांच्या पश्चात घरात कुणीही कमावणारे नाही. पत्नी गरोदर होती आणि चार वर्षांचे एक मूल त्यांना आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

मंगळवारी, ५ ऑक्टोबरला रात्री वांद्रे-वरळी सीलिंकवर एक भीषण अपघात झाला होता. या अपघातात पाच सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला होता. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सी-लिंकवर एका वाहनाचा अपघात झाल्याची माहिती टोल स्टेशनला मिळाली. माहिती मिळताच सुमारे दहा कर्मचारी रुग्णवाहिका आणि टोइंग व्हॅनसह तेथे पोहोचले. त्यांच्याकडून अपघातग्रस्त वाहनातून जखमींना रुग्णवाहिकेत हलवले जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या कारने तेथे उपस्थितांना उडवले. या घटनेत बचाव कार्यात गुंतलेल्या पाच जणांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्तांचे प्राण वाचवणारे चेतन कदम, सोमनाथ बामले,राजेंद्र सिंगल,गजराज सिंग आणि सतेंद्र सिंग यांना भरधाव वेगाने येणाऱ्या कारसमोर जीवनाची लढाई गमवावी लागली.

यामध्ये चेतन कदम यांच्या कुटुंबियांच्या समोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. सी-लिंकवर पहिल्या दिवसापासून कदम तेथे कार्यरत होते. २००९ मध्ये कदम मदतनीस म्हणून नोकरीला सुरुवात केली होती. त्यांच्या मेहनतीमुळे कदम हे हेल्परपासून सुपरवायझर या पदापर्यंत पोहोचले होते. कदम यांनी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या चार जणांचे प्राण वाचवले आहेत. कदम यांच्या या कृतीमुळे मुंबई पोलिसांकडून त्यांचा गौरव करण्यात आला.

सी-लिंकवर आत्महत्येचे कोणतेही प्रकरण उघडकीस आल्यावर पीडित व्यक्तीची समजूत काढण्यासाठी कदम यांनाच बोलावले जायचे. चेतन कदम हे त्यांच्या घरातील एकमेव कमावते सदस्य होते. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबात कोणीही कमावते उरले नाही. कदम यांच्या पश्चात चार वर्षांचा मुलगा, गर्भवती पत्नी, आई आणि बेरोजगार भाऊ असा परिवार आहे. त्यांचे कुटुंब दादर येथील फूल मार्केटजवळ भाड्याच्या घरात राहते. कदम यांच्या धाकट्या भावाची कोरोनाच्या काळात नोकरी गेली होती.

हे ही वाचा:

कॅलिफोर्नियात अपहृत पंजाबी कुटुंबातील ४ जणांचे सापडले मृतदेह

चिथावणीखोर वक्तव्य करणारे जुबेर, प्रतिक सिन्हा नोबेलसाठी नामांकित

बंगालमध्ये दुर्गा विसर्जनात मोठी दुर्घटना,आठ मृत्यू

‘उद्धवराव, लोकांशी तुम्ही बेईमानी केली, २०१९ला तुम्ही गद्दारी केली’

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) सी-लिंकवरील अपघाताची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. एमएसआरडीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पोलिस तपास अहवाल आणि त्यांच्या तपासणीच्या निकालानंतर काही नियम बदलले जातील.

Exit mobile version