महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाला आहे. लासलगाव येथे ओव्हरहेड इलेकट्रीकचे काम करणाऱ्या रेलवेच्या टॉवर वॅगन ४ रेल्वे कामगारांना चिरडले आहे . या अपघातात चारही कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. . लासलगाव-उगाव रेल्वे स्थानकादरम्यान हा भीषण अपघात झाला. अपघाताला बळी पडलेले सर्व कर्मचारी रेल्वेचे गँगमन असून ते रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीत गुंतले होते, असे सांगण्यात आले.
सोमवारी आज पहाटे ५.४४ च्या सुमारास हा अपघात झाला. रेल्वेची टॉवर वॅगन गाडी लासलगाव स्थानकांच्याजवळ उभी होती. त्यावेळी गॅंगमन आपापल्या कामात गुंतले होते . त्याच वेळी ही टॉवर गाडी चुकीच्या पद्धतीने लासलगाव कडून उगावच्या दिशेने जाऊ लागली. कामात व्यग्र असलेल्या ट्रॅकमन आणि गॅंगमन यांना त्याचा अंदाज आला नाही. काही कळण्याच्या आत चार कर्मचारी जागीच ठार झाले .
लासलगाव ते उसगावच्या दिशेने पोल क्रमांक १५ ते १७ पर्यंत ट्रॅक देखभालीचे काम सुरू होते. तेव्हा हा अपघात झाला. संतोष भाऊराव केदारे (३८ ), दिनेश सहादू दराडे (३५ ), कृष्णा आत्माराम अहिरे ( ४० ) आणि संतोष सुखदेव शिरसाठ (३८ ) अशी मृतांची नावे आहेत. ही हृदयद्रावक घटना समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. लाइट दुरुस्तीचे इंजिन चुकीच्या दिशेने आल्याने चार रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. चौघही मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांना लासलगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे.
हे ही वाचा:
लोकसभा सचिवालयाची राहुल गांधी यांना हक्कभंगाची नोटीस
पत्रकार वारिसेंच्या कुटुंबाला २५ लाखांची मदत
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या चावीमुळे बंजारा समाज विकासाच्या मार्गावर
महापालिकेसाठी भाजप मिशन १५० घोषित
रेल्वे कामगार संतप्त, निदर्शने
या दुर्घटनेनंतर रेल्वेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप निर्माण . या कर्मचाऱ्यांनी टॉवर रेल्वे गाडीच्या वाहन चालकाला खाली उतरून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. लासलगाव पोलिस कर्मचाऱ्यांनी रेल्वेच्या चालकाला सुरक्षित स्थळी लासलगाव पोलिस कार्यालयाला घेऊन गेले. या घटनेनंतर संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी रुळांमध्ये ठिय्या मारत निदर्शने सुरु केली. संतप्त झालेले कर्मचारी रेल्वे विरोधात घोषणाबाजी करत जवळपास २० मिनिटे रेल्वे वाहतूक रोखून धरली होती.