नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून १ कोटीची लाच स्वीकारणाऱ्या सहायक अभियंत्याला रंगेहाथ पकडले आहे.छत्रपती संभाजीनगर येथील एका ठेकेदाराकडून लाच मागितल्या प्रकरणी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक ही विभागाने कारवाई केली आहे.अहमदनगर एमआयडीसीतील लोखंडी पाइपलाइन बदलण्यासाठी ठेकेदारला दिलेल्या कामासाठी लाच मागितली होती .याप्रकरणी सहायक अभियंता अमित किशोर गायकवाडला शुक्रवारी रंगेहाथ पकडले असून यामध्ये दुसरा आरोपी गणेश वाघ, वर्ग १ तत्कालीन उपविभागीय अभियंता याचा देखील समावेश आहे.आरोपी सध्या कार्यकारी अभियंता म्हणून धुळे जिल्ह्यात कार्यरत आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील एका कंत्राटदाराने तक्रार दिली होती.तक्रारदार अरुण गुलाबराव मापारी हा कंत्राटदार आहे.याच्या तक्रारीनुसार याने मापारी इन्फ्रा प्रोजेक्टस या कंपनीमार्फत नगरच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळच्या औद्योगिक वसाहतीमध्ये एक हजार एमएम व्यासाच्या लोखंडी पाईपलाइनचे काम केले होते.त्याप्रमाणे एक कोटी ५७ हजार ८५ हजार रुपये आणि इतर असे २ कोटी ६६ लाख, ९९ हजार रुपयांचे बिल येणे बाकी होते. ही बिल मिळविण्यासाठी मागील तारखेचे बिल तयार करून त्यावर तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ यांच्या सह्या मिळवून बिल मंजूर करून देतो, असे सांगत सहायक अभियंता गायकवाड याने आपल्यासाठी आणि वाघ यांच्यासाठी म्हणून एक कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
हे ही वाचा:
आयएएस बनण्याची गोष्ट… सहा गोळ्या लागूनही जिवंत!
कुक्कुटपालन व्यवसायाला गती देण्यासाठी शासन प्रयत्नशील
नौदलाच्या चेतक हेलिकॉप्टरचा अपघात
बुडत्याचा पाय खोलात, आता ड्रग्ज प्रकरणीही आरोप
याबाबत कंत्राटदार मापारी याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.त्यानुसार नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. या सापळ्यात सहायक अभियंता अमित किशोर गायकवाड याला एक कोटी रुपये स्वीकारताना शुक्रवारी रंगेहाथ पकडले.
ठेकेदाराकडून एक कोटी रुपये मिळल्यावर अमित गायकवाड याने गणेश वाघ याला फोन केला. ‘सर, पैसे मिळाले आहेत, तुमचा हिस्सा कुठे पाठवू सांगा..’ त्यानंतर आनंदाने गणेश वाघ म्हणाला, ‘अरे व्वा व्वा.. सध्या तुझ्याकडेच ठेव. तुलाच ते पोहोचवायचे आहेत, ठिकाण कळवतो. तुझ्या कष्टाचे फळ तुला मिळालेच’ असे संभाषण लाचलुचपत विभागाने रेकॉर्ड केले आहे. या दोघांमधील संभाषण संपल्यावर एसीबीने गायकवाड याला एक कोटी रुपयांसह ताब्यात घेतले.
यासंदर्भातील तांत्रिक पुरावेसुद्धा लाचलुचपत प्रतिबंधक विभागास मिळाले आहेत. परंतु गायकवाड याच्यावर कारवाई झाल्याचे कळताच वाघ फरार झाला आहे. एसीबीच्या पथकाने वाघ याचे पुणे येथील घर सील केले आहे. तसेच गायकवाड याचे नगरमधील घरही सील करण्यात आले आहे.
नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा रचत करण्यात आलेल्या कारवाईत पो.ना.प्रभाकर गवळी, पो.ना.संदीप हांडगे, पो.ना.किरण धुळे ,पो.ना.सुरेश चव्हाण यांचा समावेश आहे.या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.