मुंबई- बडोदा द्रुतगती महामार्गाचे सध्या भूसंपादन सुरू आहे. या कामात बाधित होणाऱ्या घराची किंमत ठरवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इंजिनियरने लाच मागितल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. या इंजीनियरला एसीबीने सापळा रचून रंगेहात पकडले आहे. अविनाश भानुशाली असे या अभियंत्याचे नाव असून त्याच्या अटकेमुळे इतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबई- बडोदा द्रुतगती महामार्ग कल्याणजवळील रायते गावातून जात असून तक्रार करणाऱ्याच्या घराचे बांधकाम यात बाधित होत आहे. त्याचे मूल्यमापन करून अहवाल देण्यासाठी इंजिनियर भानुशाली याने ९ सप्टेंबर रोजी पडताळणी दरम्यान चार लाख घेतले. त्यानंतर अहवाल हवा असल्यास आणखी एक लाखाची मागणी भानुशाली यांनी केली. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकाने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या प्रकरणी तक्रार दाखल केली.
हे ही वाचा:
कौतुकास्पद! भारतीय दिव्यांग पोहोचले सियाचीन शिखरावर!
शिया मुसलमानांवर अन्याय होत असल्याने इराण तालिबानवर नाराज?
लवकरच कंगना दिसणार सीता मैय्याच्या भूमिकेत
कांदिवलीतली १६ वर्षीय मुलगी हैदराबादेत कशी सापडली?
ठाणे एसीबी युनिटने कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सापळा रचून एक लाखांची लाच स्वीकारताना अविनाश भानुशाली याला अटक केली. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश भानुशाली हा इंजिनियर सहा महिन्यांनी निवृत्त होणार होता, त्यापूर्वीच त्याने लाच घेतल्याने आणि त्याला अटक झाल्याने याचा मोठा फटका भानुशाली याला बसणार आहे.
गेल्या १५ दिवसांत एसीबीच्या जाळ्यात कल्याण- डोंबिवलीतील तीन प्रशासकीय अधिकारी सापडले आहेत. ३० ऑगस्टला कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे आणि शिपाई बाबू हरड यांना १ लाख २० हजारांची लाच घेताना अटक केली होती. त्यानंतर ७ सप्टेंबरला पाणी पुरवठा विभागचे अभियंता सुनील वाळंज याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले होते.