पॅरोल वर बाहेर येऊन पळून गेलेल्या गवळी गॅंगचा शार्प शूटर नरेंद्र गिरीला नवीमुंबईतील घणसोली येथून अटक करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ३ च्या पथकाने ही कारवाई केली आहे.नरेंद्र गिरी ला नगरसेवक कमलाकर जामसां
डेकर हत्याकांडात जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे.नरेंद्र गिरी हा गँगस्टर अरुण गवळी टोळीचा शार्पशूटर असून जामसांडेकर यांच्यावर नरेंद्र गिरी आणि विजयकुमार गिरी यादोघांनी गोळ्या झाडून ठार केले होते अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकारी यांनी दिली.
नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्याकांड मार्च २००७ मध्ये मुंबईतील असल्फा व्हिलेज साकिनाका येथे घडले होते. जामसांडेकर यांच्या हत्येसाठी सदाशिव सुर्वे याने गवळी टोळीला ३० लाख रुपयांची सुपारी दिली होती. गँगस्टर अरुण गवळी याने जामसांडेकर यांच्या हत्येची जबाबदारी प्रताप गोडसे याला दिली होती. प्रताप गोडसे याने जामसांडेकर यांच्या हत्येसाठी नरेंद्र लालमणी गिरी आणि विजयकुमार गिरी या दोन शार्प शूटर ची निवड केली होती.
हे ही वाचा:
मी कुणाला सोडत नाही म्हणत शरद पवारांनी आमदारालाच धमकावले!
कुलदीप, अश्विनने इंग्लंडला घातला लगाम
धरमशाला कसोटीत कुलदीप यादवने ‘करून दाखवले’
भाजपा नेते प्रमोद यादव यांची गोळ्या झाडून हत्या
या हत्याकांडात मुंबई गुन्हे शाखेकडून जवळपास दोन डझन जणांना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात दगडी चाळीचा डॉन गँगस्टर अरुण गवळी याच्यासह १२ जणांना न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. जन्मठेपेची शिक्षा सुनाविण्यात आलेल्या अरुण गवळी सह १२ ही गुंडांची राज्यातील वेगवेगळ्या तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. यापैकी शार्पशूटर नरेंद्र लालमणी गिरी (३६) हा कोल्हापूर तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. गेल्यावर्षी ११ नोव्हेंबर २०२३मध्ये नरेंद्र गिरी याला ३१जानेवारी २०२४ पर्यत पॅरोल देण्यात आली होती. १ फेब्रुवारी रोजी गिरीला पुन्हा कोल्हापूर तुरुंगात हजर व्हायचे होते परंतु तो तुरुंगात न जाता त्याने महाराष्ट्राच्या बाहेर पळ काढला होता. याप्रकरणी कोल्हापूर तुरुंग प्रशासनाने नवी मुंबईतील तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
गिरी याच शोध घेण्यात येत असताना नरेंद्र गिरी हा नवीमुंबईतील घणसोली येथे एकाला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखा कक्ष ३चे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांच्या पथकाला मिळाली होती. पोलीस उपायुक्त (गुन्हे) दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे, पो.उपनिरीक्षक इंद्रजित शिरसाठ,अंमलदार.आकाश मांगले, राहुल अनभुले, सुहास कांबळे, भास्कर गायकवाड आणि शिवाजी जाधव या पथकाने बुधवारी रात्री घणसोली येथे सापळा रचून नरेंद्र गिरी याला ताब्यात घेवुन पुढील कार्यवाहीसाठी नरेंद्र गिरी याला तुर्भे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिली.