१९९२ साली खून करून पळून गेलेला खुनी तब्बल २८ वर्षांनी पोलिसांच्या हाती लागल्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. ठाणे, तर कधी मुंबईत वेष बदलून राहणाऱ्या या खुन्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी जंगजंग पछाडले होते. अखेर तो २८ वर्षांनी भांडुप येथील टेंभीपाडा येथे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळून आला आहे. गुन्हे शाखेने त्याला अटक करून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
काका काका ओरडणाऱ्या घरकोंबडयाची राज्यभर चर्चा
आंतरजिल्हा ई-पासही विकला जातोय
‘केम छो वरळी’वाल्यांचे गुजरात ‘प्रेम’
सुरेश गणपत जामसांडेकर ऊर्फ बोईसर असे अटक करण्यात आलेल्या खुन्याचे नाव आहे. वयाच्या २०व्या वर्षी म्हणजे १९९२ मध्ये सुरेशने आर्थिक वादातून गोरेगाव येथे राहणाऱ्या रमेश खाडे याची हत्या केली होती. हत्येनंतर त्याला गोरेगाव पोलिसांनी अटक केली होती. चार महिने तुरुंगात राहून जामिनावर बाहेर आलेला सुरेश जामसंडेकर हा पुन्हा न्यायालयात हजर झालाच नाही. न्यायालयाने त्याच्या विरुद्ध अटकवॉरंट काढले होते. पोलीस त्याच्यासाठी जंगजंग पछाडत होती. मात्र सुरेश हा पोलिसांच्या हाती येत नव्हता.
अखेर १९९२ मध्ये झालेल्या खुनातील आरोपी सुरेश जामसांडेकर हा भांडुप टेंभी पाडा येथे वेष बदलून राहत असल्याची माहिती गुन्हे कक्ष ११ ला मिळाली. या माहितीच्या आधारे कक्ष ११च्या पथकाने गुरुवारी त्याला भांडुप येथून ताब्यात घेऊन गोरेगाव पोल्सीणच्या हवाली केले. गोरेगाव पोलिसांनी त्याला स्थानिक न्यायालयत हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी तुरुंगात केली आहे. सुरेश जामसंडेकर हा पळून गेल्यानंतर वेष बदलून फिरत होता, मिळेल ते काम करून स्वतःचा उदरनिर्वाह चालवत त्याने अखेर भांडुप येथे टेंभीपाडा येथे आश्रय घेतला. तिथेच त्याने विवाह करून राहू लागला होता. मागील २८ वर्षात त्याने स्वतःची ओळख लपवत राहिला होता.