आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केली आहे. दिल्लीतील मद्यघोटाळ्यासंदर्भात जे मनीललॉन्ड्रिंग झाले त्या प्रकरणात ही कारवाई झाली आहे. प्रथमच अशा प्रकारे एका विद्यमान मुख्यमंत्र्याला अटक करण्यात आली आहे. रात्री ११ वाजता ईडीचे अधिकारी केजरीवाल यांना घेऊन ईडी कार्यालयाकडे निघाले होते. त्याआधी, त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार होती.
याबाबत दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी म्हटले आहे की, केजरीवाल हेच मुख्यमंत्री राहतील. ते तुरुंगातून सरकार चालवतील. तेच दिल्लीचे मुख्यमंत्री असतील. आम्ही सर्वोच्च न्यायालयात या अटकेविरोधात याचिका दाखल केली आहे. आमचे वकील सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. रात्रीच यासंदर्भात न्यायालयाने निर्णय द्यावा अशी मागणी वकिलांनी केली आहे. शुक्रवारी केजरीवाल यांना विशेष पीएमएलए न्यायालयात उभे करण्यात येईल. तिथे त्यांच्या चौकशीसाठी त्यांची कोठडी मागितली जाईल.
हे ही वाचा:
मोदींची तुलना औरंगजेबाशी हा तर देशद्रोह!
‘विकसित भारत’चे मेसेज शेअर करू नका!
राहुल गांधींची भूमिका इंदिरा आणि राजीव गांधी यांच्या भूमिकेशी विसंगत
‘केशवा’ने घेतले ‘रामा’चे दर्शन
केजरीवाल यांच्या घरी गुरुवारी संध्याकाळी ईडीचे अधिकारी पोहोचले. तेव्हा केजरीवाल मंत्रिमंडळातील सौरभ भारद्वाज केजरीवाल यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांना केजरीवाल यांना भेटू दिले नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना पाठविण्यात आलेल्या समन्सविरोधात स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर त्यांना अटक होणार यावर शिक्कामोर्तब झाले. त्याप्रमाणे ईडीचे अधिकारी केजरीवाल यांच्या घरी पोहोचले. दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांच्याविरोधातील सर्व पुरावे देण्याचे निर्देश ईडीला दिले होते. त्यानुसार सर्व पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले आहेत.
दिल्ली भाजपाचे प्रमुख वीरेंद्र सचदेव यांनी केजरीवाल यांचा राजीनामा मागितला आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होता, त्यांना अटक झाल्यामुळे दिल्लीतील जनतेने सुटकेचा निश्वास सोडला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या कारवाईवर टीका केली आहे. लोकशाहीची हत्या करण्याचा हा प्रयत्न आहे. माध्यमे, पक्षांमध्ये फाटाफूट निर्माण करणे, कंपन्यांकडून पैसे उकळणे हे केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक केली आहे, असे गांधी यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार यांनी म्हटले आहे की, सत्तेसाठी भाजपा आसुसलेला आहे. त्यासाठी अशी अटक केली जात आहे.