तीन महिन्यांपूर्वीच सोशल मीडियावरून झालेल्या मैत्रीचे पर्यवसन हत्येत झाले आहे. एका २४ वर्षीय तरुणाने खासगी बँकेत मॅनेजर असणाऱ्या ३५ वर्षीय मैत्रिणीची तुर्भेतील लॉजमध्ये हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शोएब शेख असे या मारेकऱ्याचे नाव आहे.
शोएब याचे अमित कौर (३५) हिच्याशी सप्टेंबर महिन्यापासून प्रेमसंबंध होते. अमित कौर ही घटस्फोटित असून एका अल्पवयीन मुलीची आई आहे. अमित कौर हिचे दुसऱ्या व्यक्तीशी संबंध असल्याचा संशय आल्याने शोएब याने तिची हत्या करण्याचा कट रचला. अमितचा ८ जानेवारी रोजी वाढदिवस होता. तिचा वाढदिवस रात्रभर साजरा करण्याचे निमित्त साधून त्याने तिला बाहेर नेले आणि तिची हत्या केली. शोएबच्या ठावठिकाण्याबाबत साकीनाका पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक वाल्मिकी कोरे यांना माहिती मिळाली होती. ‘शेख याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलिस चौकशीत त्याने महिलेची नवी मुंबईतील लॉजमध्ये हत्या केल्याची कबुली दिली,’ असे पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले.
जुईनगर येथील बँकेत काम करणाऱ्या कौर हिने सोमवारी बँकेची ड्युटी संपल्यानंतर शेख याची भेट घेतली. त्यांनी वाढदिवस साजरा केल्यानंतर ते दोघेही एका लॉजमध्ये गेले. शेख आणि कौर यांनी स्वतःची ओळखपत्रे दाखवून रूम बुक केली. मध्यरात्रीच्या सुमारास शेख हा लॉजच्या परिसरातून बाहेर पडत असल्याचे कर्मचाऱ्यांना दिसले. मात्र त्यात त्यांना संशयास्पद असे काही आढळले नाही. मात्र जेव्हा पोलिसांनी हॉटेलच्या रुमचे दार उघडले, तेव्हा त्यांना कौर मृतावस्थेत आढळली, असे तुर्भे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी सांगितले.
शालेय शिक्षणही पूर्ण न केलेला शेख तेव्हा साकीनाका येथील घरी पोहोचला होता. तो त्याच्या एका नातेवाइकाच्या मालकीच्या असलेल्या गॅरेजमध्ये काम करतो. मात्र पहाटे दोनच्या सुमारास साकीनाका पोलिस ठाण्याचे कोरे यांना एका खबऱ्याने फोन केला. त्याच्या शेजारच्या एका व्यक्तीने काही तरी चुकीचे केले असल्याची खबर या खबऱ्याने कोरे यांना दिली. त्यानंतर शेख याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आणि त्याला पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर शेखने त्याच्या मैत्रिणीची हत्या केल्याची कबुली दिली.
हे ही वाचा:
मालदीववरून शरद पवार मोदींच्या पाठीशी!
लक्षद्वीपच्या मिनिकॉय बेटावर नवं विमानतळ बांधणार; नागरी, लष्करी विमाने उतरवता येणार
चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डीला खेलरत्न तर शमीला अर्जुन!
लाइटहाऊस’ प्रकल्प करेल दीपस्तंभाप्रमाणे काम
शेख याने कबुलीजबाब दिल्यानंतर साकीनाका पोलिसांनी तुर्भे पोलिसांशी संपर्क साधला. पहाटे साडेतीनच्या सुमारास तुर्भे पोलिस या लॉजवर धडकले आणि तेव्हा शेख याने कौर हिची हत्या केल्याचे आढळून आले. या प्रकरणी तुर्भे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शेख याला त्यांच्या ताब्यात देण्यात आल्याचे साकीनाक्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गाबाजी चिमटे यांनी सांगितले. कौर ही जीटीबी नगरमध्ये तिच्या आईसोबत वास्तव्याला होती, तर, तिची अल्पवयीन मुलगी तिच्या माजी पतीसोबत राहते.