मणिपूरमध्ये झालेल्या सुमारे दोन तासांच्या चकमकीत लष्कर आणि आसाम रायफल्सने शुक्रवारी रात्री कुकी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यातून ७५ मैतेई महिलांची सुटका केली. कांगपोकपी जिल्ह्याच्या पायथ्याशी असलेल्या बिष्णुपूर जिल्ह्यातील वारियोसिंग भागात मीरा पायबिस (महिला कार्यकर्त्या) रात्रीची गस्त घालत होत्या. मात्र त्यांना अतिरेक्यांच्या हल्ल्याबाबत सुतराम कल्पना नव्हती.
‘रात्री साडेदहाच्या सुमारास, आमच्या नाईट व्हिजन थर्मल कॅमेऱ्यांनी पायथ्याशी दहशतवाद्यांच्या हालचाली पकडल्या. ते बफर झोनमधील रस्त्यावर त्यांच्या गावांचे रक्षण करणाऱ्या महिलांपर्यंत पोहोचले,’ असे आसाम रायफल्सच्या अधिकाऱ्याने सांगितले.
गेल्या तीन आठवड्यांतील हा सर्वांत मोठा संघर्ष मानला जात आहे. याआधीची वांशिक संघर्षातील शेवटची हत्या २८ एप्रिल रोजी नोंदवण्यात आली. सध्या सुरू असलेल्या वांशिक संघर्षामुळे मुख्यतः इम्फाळ खोऱ्याच्या मैदानात राहणारे मैतेई आणि प्रामुख्याने टेकड्यांमध्ये राहणारे कुकी यांना आपापल्या बाजूने माघार घ्यावी लागली आहे. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर म्हणून सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये महामार्गांवर बफर झोन, छावण्या आणि चौक्या स्थापन केल्या आहेत.
शुक्रवारी उशिरा दहशतवादी या महिलांच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना सुरक्षा दलांनी त्यांना रोखण्यासाठी भोंगा वाजविला, परंतु त्यांनी गावे आणि महिलांच्या दिशेने गोळीबार सुरूच ठेवला. त्यानंतर मैतेई गावांतील ग्राम स्वयंसेवकांनी गोळीबार केला. या दोघांच्या गोळीबारादरम्यान ७५ निशस्त्र महिला रक्षक अडकल्या होत्या.
गोळीबार सुरू होताच सुरक्षा दलाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी खोऱ्यातील सशस्त्र गटांचा पाठलाग केला, त्यांना रोखण्यासाठी पायथ्याशी ८१ मिमीचे तोफगोळे डागले आणि महिलांसाठी सुरक्षित मार्ग तयार करण्याकरिता गावप्रमुखांसोबत काम केले.
‘सुरक्षा दलाच्या एका गटाने प्रथम खोऱ्यातील सशस्त्र गटांचा पाठलाग केला. दुसऱ्या गटाने पायथ्याशी ८१ मिमी तोफगोळे डागायला सुरुवात केली. तिसरी टीम मैतेई गावांच्या गल्लीबोळात गेली आणि सुरक्षित मार्ग तयार करण्यासाठी गावातील प्रमुखांना सोबत घेतले. येथील गावकऱ्यांचे सशस्त्र गटही चुकून सुरक्षा दलावर गोळीबार करू शकतात, हे लक्षात घेऊन त्यांना विश्वासात घेण्यात आले,’ असे आसाम रायफल्सच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. पहाटे साडेबारा वाजेपर्यंत लष्कराने ७५ महिलांना लीमाराममध्ये सुरक्षित नेण्यात यश मिळविले. तर दहशतवादी पहाटे एक वाजता परत टेकड्यांवर पळून गेले.
हे ही वाचा:
देशात पाचव्या टप्प्यात ४९ जागांचे भवितव्य ठरणार; राज्यात अंतिम टप्प्याच्या मतदानासाठी रांगा
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष रईसी यांचा मृत्यू
‘मुख्यमंत्री केजरीवाल हे धूर्त, अहंकारी अन सर्वात मोठे बेईमान’
गोंधळामुळे राहुल गांधी, अखिलेश यांचा भाषण न करताच काढता पाय!
गोळीबारामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. मात्र, गोळीबारामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मणिपूर पोलिसांनी अद्याप याबाबत निवेदन जारी केलेले नाही. ‘सशस्त्र हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यादरम्यान लष्कर आणि आसाम रायफल्सने सुमारे ७५ ‘मीरा पायबीस’(महिला कार्यकर्त्या) यांची सुटका करून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. सुरक्षा दलांनी मोठी आग आटोक्यात आणून आणि उयोकमधील गावकऱ्यांचे प्राण वाचवून हा हल्ला परतवून लावला. मणिपूरमध्ये सामान्य स्थिती आणण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचा त्यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्स कटिबद्ध आहेत,’ असे आसाम रायफल्सने स्पष्ट केले आहे.
पायथ्याशी असलेल्या बफर झोनमध्ये महिलांना पाहून अतिरेकी रात्री हल्ला करण्यास प्रवृत्त झाले असावे, असे या मोहिमेचे निरीक्षण करणाऱ्या एका अधिकाऱ्याने नमूद केले आहे. या घटनेनंतर येथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली असल्याने परिसरात शांतता आहे.