जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे मध्यरात्री लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा झाला तर एका जवानाला हौतात्म्य मिळाले आहे. काश्मीरमध्ये २४ तासांतील ही दुसरी चकमक आहे. मंगळवारी कुपवाडा जिल्ह्यातील कोवूत येथे दोन ते तीन दहशतवादी घुसल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. यानंतर शोधमोहीम राबविण्यात आली होती.
काही दिवसांपूर्वी कुपवाडा येथील कोवुत भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने जम्मू-काश्मीर पोलिसांसह संयुक्त शोध मोहीम सुरू केली होती. दरम्यान, कुपवाडा येथे बुधवारी पहाटे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारात एक जवान हुतात्मा झाला तर एक दहशतवादी ठार झाला आहे.
लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (२३ जुलै) कुपवाडा जिल्ह्यातील कोवूत येथे दोन-तीन दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळाली होती. यानंतर शोधमोहीम राबविण्यात आली. दरम्यान लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराचा एक जवान जखमी झाला. पुढे त्याला रुग्णालयात दाखल केले पण त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अद्याप या हुतात्मा जवानाची ओळख समोर आलेली नाही.
दहशतवाद्यांनी पहिले लष्करावर गोळीबार केला; त्याला प्रत्युत्तर म्हणून लष्कराने गोळीबार केला आणि चकमक सुरू झाली. कुपवाडाच्या कोवूतमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये अजूनही गोळीबार सुरू आहे. घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या या दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरले आहे.
हे ही वाचा:
पूजा खेडकरने आयएएस प्रशिक्षण केंद्राचा आदेश धुडकावला; अंतिम मुदत उलटूनही गैरहजर
मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित; सरकारला दिली मुदतवाढ
चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग होत असतानाचं जाणवला भूकंपाचा धक्का
बेवारस रुग्णांना अज्ञात स्थळी सोडणारा ससूनचा डॉक्टर निलंबित
मागील आठवड्याच्या सुरुवातीला, सुरक्षा दलांनी कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (एलओसी) घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. दोन दहशतवाद्यांना निष्प्रभ केले होते. उत्तर काश्मीर जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळील खोऱ्यात घुसखोरी करण्याच्या दहशतवाद्यांच्या प्रयत्नांबद्दल गुप्तचर माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली होती. यावेळी सतर्क सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या हालचाली टिपल्या. गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले होते.