नांदेड पोलीस आणि गुजरात पोलिसांनी संयुक्तपणे नांदेडमध्ये मोठी कारवाई केली आहे. देशविघातक कृत्य करणाऱ्या पाकिस्तानमधील एका व्हॉट्सऍप ग्रुपशी संपर्कात असणाऱ्या आरोपींसोबत संबंध असल्याच्या संशयावरून एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आहे. शेख शकील शेख सत्तार (वय १९ वर्षे) असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. गुजरातमधील सुरत येथील डीसीबी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.
पाकिस्तानमध्ये वकास आणि सरफराज डोगर हे दोघेजण जैश बाबा राजपूत नावाचा व्हॉट्सऍप ग्रुप चालवतात. या ग्रुपमध्ये गुजरातमधील सुरतचे सोहेल टिमोल आणि बिहार मधील शहनाज हे दोघे सामील आहेत. या आरोपींनी मिळून सनातन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपदेश राणा, हैदराबादचे राजासिंह, सुदर्शन वृत्त वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाण, नुपूर शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. याशिवाय परदेशातून शस्त्रे विकत आणण्यासाठी या ग्रुपमध्ये बोलणे झाल्याचेही आढळून आले. या आरोपींच्या व्हॉट्सऍप चॅटिंगमध्ये शेख शकील शेख सत्तार हा देखील सहभागी झाल्याचे दिसून आले. त्यावरून गुजरात पोलिसांनी नरसी येथून शेख शकील शेख सत्तार याला ताब्यात घेतले आहे.
नांदेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरसी येथील १९ वर्षीय मुलगा हा पाकिस्तानच्या व्हॉट्सऍप ग्रुपशी संपर्कात होता. त्याला गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतलं असून ते पुढील तपास करत आहेत. या संबंधी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर राष्ट्रविरोधी कारवाई केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात वेगवेगळ्या राज्यांमध्ये गु्न्हा नोंद करण्यात आला असून अनेकांवर पाळत ठेवण्यात येत आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या काँग्रेससोबत जाणाऱ्यांना लाज वाटायला हवी!
‘घाटकोपर दुर्घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश’
‘पाकिस्तानचे गुणगान गाणाऱ्यांनी तिकडं जा, भीक मागून खा’
‘देशात एनडीए ४०० जागा जिंकण्याच्या मार्गावर!’
काही दिवसांपूर्वी देशातील हिंदू नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा कट रचल्याचा आरोप असलेल्या मोहम्मद सोहेल उर्फ मौलवी अबुबकर तेमोल याला सुरत गुन्हे शाखेने अटक केली होती. अटक करण्यात आलेला मौलवी पाकिस्तानच्या संपर्कात होता. त्याच्यावर नुपूर शर्मा, भाजपा आमदार टी. राजा सिंह आणि उपदेश राणा यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होता. मौलानाच्या मोबाईल फोनवरून अनेक महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली. तो सातत्याने पाकिस्तानमधील कट्टरपंथीयांच्या संपर्कात होता. त्या ठिकाणावरुन शस्त्रास्त्रे मिळवण्याचा त्याचा प्रयत्न होता.