पाकिस्तानला गोपनीय माहिती देणाऱ्याला राजस्थानमधून अटक

दोन वर्षांपासून पाकिस्तानी महिला गुप्तहेरांच्या होता संपर्कात

पाकिस्तानला गोपनीय माहिती देणाऱ्याला राजस्थानमधून अटक

पाकिस्तानची गुप्तचर संघटना इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सला (आयएसआय) देशाची गोपनीय माहिती पाठवणाऱ्या तरुणाला राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे. नरेंद्र कुमार असे आरोपी तरुणाचे नाव असून तो गेल्या दोन वर्षांपासून पाकिस्तानी महिला गुप्तहेरांच्या संपर्कात होता. हनीट्रॅपमध्ये अडकून त्याने देशातील संवेदनशील माहिती शत्रुला दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

राजस्थानचे अतिरिक्त पोलिस महासंचालक एस सेनगाथिर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर शाखा सतत सीमावर्ती भागात आयएसआयच्या कारवायांवर लक्ष ठेवते. सततच्या निरिक्षणानंतर, असे लक्षात आले की नरेंद्र कुमार (वय २२) हा सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या दोन महिला एजंट्सच्या सतत संपर्कात आहे.

व्यवसायाने बाईक मेकॅनिक आणि भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असलेल्या बिकानेरमधील आनंदगढ खाजुवाला येथील रहिवासी असलेल्या कुमारला पोलिसांनी तात्काळ जयपूर येथील संयुक्त चौकशी केंद्रात आणले आले. चौकशीदरम्यान, त्याने उघड केले की, तो सुमारे दोन वर्षांपूर्वी “पूनम बाजवा” आणि “सुनीता” नावाच्या महिलांच्या फेसबुकद्वारे संपर्कात आला होता.

नरेंद्र कुमारला पूनमने ती, पंजाबमधील भटिंडा येथील रहिवासी असून, बीएसएफमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करत असल्याचे सांगितले होते. अतिरिक्त पोलिस महासंचालक एस सेनगाथिर यांनी सांगितले की, पूनमने कुमारशी मैत्री केली आणि त्याच्याशी लग्न करण्याचे आश्वासन देऊन त्याला सीमावर्ती भागाबद्दल संवेदनशील माहिती गोळा करण्यास सांगितले होते. त्यानंतर पूनमने नरेंद्रला एक व्हॉट्सऍप नंबर दिला आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील भारतीय भूभागाची संवेदनशील माहिती जसे की रस्ते, पूल, बीएसएफ पोस्ट, टॉवर, लष्कराच्या वाहनांचे फोटो आणि प्रतिबंधित ठिकाणांचे फोटो/व्हिडीओ मागितले, जे त्याने वेळोवेळी तिला पाठवले होते.

हे ही वाचा.. 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन खासदारांनंतर आमदाराचा राजीनामा

मराठी नवउद्योजकांनी व्यावसायिक यशासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा करुन घ्यावा

उत्तर गाझाच्या सीमेवर इस्रायली रणगाडे

लिओनेल मेस्सी आठव्यांदा ठरला ‘बॅलन डी’ओर’ चा मानकरी

दुसरी महिला सुनीता हिने एका राष्ट्रीय वृत्तपत्राची स्थानिक पत्रकार असल्याचे सांगून नरेंद्र कुमारशी मैत्री केली. नरेंद्रने तिच्यासोबत संवेदनशील माहिती शेअर करावी अशी तिची मागणी होती. नरेंद्र कुमारने अशी माहिती सुनितासोबत शेअर केल्याचे कबूल केल्याचे सेनगाथिर म्हणाले. नरेंद्र कुमारच्या मोबाइल फोनची तांत्रिक तपासणी केल्यानंतर, त्याच्यावर तात्काळ ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट, १९२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली.

Exit mobile version