मुंबईजवळील मीरा रोड भागात एका अल्पवयीन मुलाला ‘जय श्री राम’ बोलला म्हणून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एक अल्पवयीन मुलगा ‘जय श्री राम’ बोलला म्हणून काही तरुणांनी त्याला बेदम मारहाण केली आहे. तसेच त्याला ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा द्यायला देखील भाग पाडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून या घटनेची चौकशी सुरू आहे. पीडित मुलाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
सोमवार, २५ मार्च रोजी रात्री एक अल्पवयीन मुलगा दूध घेऊन त्याच्या सोसायटीमध्ये आला. सोसायटीजवळ येताच तिकडे उभ्या असलेल्या एका माणसाला तो ‘जय श्री राम’ बोलला. त्यावेळी त्या व्यक्तीच्या बाजूला असलेल्या अन्य पाच जणांनी त्याला थांबायला सांगितलं. पण, त्यांना घाबरून हा मुलगा सोसायटीच्या आत पळाला. त्यावेळी हे तरुणसुद्धा त्याचा पाठलाग करत सोसायटीमध्ये शिरले. त्यांनी त्या पीडित मुलाला लिफ्ट जवळ गाठलं आणि मारहाण केली.
त्याला माराहण केल्यानंतर तरुणांनी त्या मुलाला ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा द्यायला लावल्या. पीडित मुलाने भितीपोटी घोषणाही दिल्या. अशातच तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने या घटनेची माहिती संबंधित मुलाच्या वडिलांना दिली. पीडित मुलाचे वडील घटनास्थळी पोहचताच मारहाण करणारे तरुण पळून गेले.
हे ही वाचा:
पंजाबमध्ये अकाली नको; भाजपा ‘अकेला’ करणार वाटचाल
पुतिन म्हणतात, मॉस्को हल्ल्यामागे ‘कट्टरपंथी इस्लामवादी’
सुप्रिया श्रीनेटच्या आक्षेपार्ह पोस्टवर कंगना राणौतचा पलटवार!
ओम बिर्ला यांना टक्कर देण्यासाठी प्रल्हाद गुंजाळ मैदानात!
दरम्यान, पीडित मुलाने सांगितलं की, “तो जेव्हा सोसायटीच्या दिशेने आला त्यावेळी त्याला वाटलं की, सोसायटीचा वॉचमन उभा आहे आणि म्हणून त्याने त्या व्यक्तीला ‘जय श्री राम’ म्हटलं.” मारहाण करणारे आरोपी पीडित मुलाचा पाठलाग करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. मीरा रोड भागात या पूर्वीही जातीय वाद झाला होता. श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठेपूर्वी २१ जानेवारीला दोन गटांमध्ये वादावादी झाली होती. या मुलाला झालेल्या मारहाणीनंतर पोलीस प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आले आहे.