बिहारमध्ये रातोरात उड्डाणपूल आणि रस्ते चोरीला जात असल्याची घटना घडत असतानाच बिहारमध्ये आता चक्क थेट तलावाची ‘चोरी’ झाल्याचे उघड झाले आहे. बिहारमधील दरभंगा जिल्ह्यात एका रात्रीत हा तलावच चोरण्यात आला असून येथे चक्क एक झोपडी उभारण्यात आली आहे.
सरकारी मालकीच्या या तलावाची चोरी भूमाफियांनी केली आहे. भूमाफियांनी हा तलाव मातीने पूर्ण भरून त्यावर झोपडी उभारली आहे. येथे रात्रभर ट्रक आणि यंत्रांची ये-जा सुरू असल्याने स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना कळवले आणि ही बाब उघड झाली.
या तलावाचा वापर मत्स्यशेतीसाठी आणि झाडांना पाणी देण्यासाठी वापरला जात असे. आता मात्र येथे समतल जमीन दिसत असून त्यावर झोपडीही उभारण्यात आली आहे. त्यामुळे येथे आदल्या रात्रीपर्यंत तलाव होता, याचा मागमूसही आढळत नाही.
हे ही वाचा:
जयंत पाटील भाजपाबरोबर येणार असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता
इम्रान खान निवडणूक लढण्यास अपात्र
‘सर्व निर्णय घेताना प्रथम असते फक्त राष्ट्रहित’!
३१ वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी सापडला जाळ्यात!
‘स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेले १० ते १५ दिवस हा तलाव बुजवला जात होता. बहुतेकवेळी हे काम रात्रभरच केले जायचे. ही जमीन कोणाची आहे, याबाबत आम्हाला काहीच माहीत नाही,’ असे तेथील पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. आता दरभंगा पोलिस या आगळ्यावेगळ्या चोरीचा तपास करत आहेत. तर, पोलिस आणि जिल्ह्याधिकाऱ्यांच्या संगनमतानेच हा तलाव बुजवण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.