गुजरात पोलिसांनी शनिवार, ४ मे रोजी देशातील हिंदू नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा कट रचल्याचा आरोप असलेल्या मोहम्मद सोहेल उर्फ मौलवी अबुबकर तेमोल याला सुरत येथून अटक केली आहे. त्याच्यावर आमदार टी राजा, नुपूर शर्मा, उपदेश राणा यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. अटक करण्यात आलेला मौलवी पाकिस्तानच्या संपर्कात होता हे समोर आले आहे. त्याच्या योजना राबविण्यासाठी मौलवी पाकिस्तान आणि नेपाळमध्ये राहणाऱ्या काहींच्या संपर्कात होता. सुरक्षा यंत्रणांना चुकवण्यासाठी तो परदेशी सिमकार्डचाही वापर करत होता, अशी बाबही उघड झाली आहे. आता त्याच्या चौकशीत आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे.
गुजरात पोलिसांच्या म्हणण्यानुसार, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पोलिसांचे पथक अलर्ट मोडवर होते. दरम्यान, सुरतच्या गुन्हे शाखेने मोहम्मद सोहेल नावाच्या मौलवीच्या संशयास्पद हालचाली पाहिल्या होत्या. तो मूळचा महाराष्ट्रातील नंदुरबारचा आहे. त्यांनी सूरतमधील मदरशात हाफिज म्हणून काम केले आणि कर्जन-आंबोली गावात मुस्लिम विद्यार्थ्यांना शिकवणीद्वारे धार्मिक शिक्षणही दिले. सोहेल सुरतच्या डायमंड नगर येथील धाग्याच्या कारखान्यात व्यवस्थापक म्हणूनही काम करत होता.
मौलवी हा मागील दीड वर्षापासून पाकिस्तान आणि नेपाळमधील हस्तकांच्या संपर्कात होता, असे पोलिसांनी त्यांच्या चौकशीत उघड केले आहे. नेपाळमधील हँडलरचे नाव शहजाद असे असून मौलवी त्याच्याशी लाओसमधून जारी केलेल्या सिमकार्डद्वारे बोलत होता. त्याने संवाद साधण्यासाठी व्हॉट्सऍप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला होता. सोहेलला त्याच्या वरिष्ठांनी इस्लामिक पैगंबरांच्या सन्मानाची बदनामी करणाऱ्यांना सरळ करण्याचे आदेश दिले होते. सुरेश चव्हाण, नुपूर शर्मा, टी राजा सिंग आणि उपदेश राणा यांना विदेशी हँडलर्सनी मौलवीला लक्ष्य करण्यास सांगितले आणि त्यांचा गळा चिरून त्यांची हत्या करण्याचा आग्रह केला होता. तसेच या हत्येच्या बदल्यात मौलवीला १ कोटी रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
पुढे मौलवी याने स्वतःचा व्हॉट्सऍप ग्रुप देखील सुरू केला आणि हँडलर्सच्या सांगण्यावरून त्याच्या कट्टरपंथी विचारधारा सामायिक केलेल्या लोकांना जोडले होते. मौलवीने या गटामध्ये हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी पोस्ट केली होती, तसेच उपदेश राणाचा फोटो आणि त्याला मारण्याचे आवाहन केले होते. तसेच त्याने त्याच्या ग्रुपमध्ये हिंदू देवी-देवतांच्या दुर्भावनापूर्ण प्रतिमाही अपलोड केल्या होत्या. त्याचे पाकिस्तान आणि नेपाळ व्यतिरिक्त व्हिएतनाम, इंडोनेशिया, कझाकस्तान आणि इतर देशांमध्ये संपर्क असल्याचा संशय आहे. मौलवी परदेशी हँडलर्समार्फत शस्त्रास्त्रे मागवण्याचे कामही करत होता. मौलवी याने त्याच्या व्हॉट्सऍप प्रोफाईलचा फोटो हमासच्या दहशतवाद्यांचा ठेवला आहे. ज्यामध्ये अनेक मुखवटा घातलेले अतिरेकी प्राणघातक शस्त्रांसमोर नतमस्तक झालेले आहेत. तसेच त्याने ट्रू कॉलरवर तोडक्या मोडक्या इंग्रजीत ‘ओवेसीचे अनुयायी’ असे लिहिले होते. मात्र, त्याचा प्राणघातक कट राबविण्यापूर्वीच त्याला सुरत गुन्हे शाखेने अटक केली आहे.
हे ही वाचा:
“यंदाच्या निवडणुकीत उबाठाच्या मशालीची चिलीम होणार”
दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू!
गुजरातवरील विजयामुळे बेंगळुरूच्या ‘प्लेऑफ’मध्ये जाण्याच्या आशा जिवंत!
‘रोहित वेमुलाच्या मृत्यूचे राजकारण केल्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी’
मोहम्मद सोहेल उर्फ मौलवी अबुबकर तेमोल याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ (ए), ४६७, ४६८, ४७१, १२० (बी) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या कलम ६६ (डी), ६७, ६७ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरत गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे.