वरिष्ठांचा त्रास; आत्महत्येआधी दलित युवकाने केली पोस्ट

बेंगळुरू येथे खासगी कंपनीत होता नोकरीला

वरिष्ठांचा त्रास; आत्महत्येआधी दलित युवकाने केली पोस्ट

ऑफिसमध्ये जातीवरून छळ होत असल्याकारणाने एका ३५ वर्षीय दलित तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. आत्महत्येआधी तरुणाने  एक व्हिडीओ युट्यूबवर पोस्ट केला असून त्यात त्याने आत्महत्येमागचे कारण सांगितले आहे. विवेक राज असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव होतं.

विवेक राज हा मुळचा उत्तर प्रदेशातील कप्तानगंज बस्तीचा रहिवासी होता. तर, बंगळुरूत लाईफस्टाईल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत व्हिज्युअल मर्चेंडाइझर म्हणून काम करत होता. बंगळुरूच्या ब्रूक फिल्डमधील रिपब्लिक ऑफ व्हाइटर फिल्डमध्ये तो वास्तव्यास होता. आत्महत्येआधी विवेकने व्हिडीओ पोस्ट केला असून “मी लढण्यास अमसर्थ आहे. काही सहकाऱ्यांकडून माझा छळ होत आहे आणि काही मुद्दे मांडल्याबद्दल मला त्रासही सहन करावा लागला”, असं या व्हिडीओत त्याने म्हटलं होतं.

आत्महत्येआधी त्याने पोलिसांत यासंबंधी तक्रार देखील दाखल केली होती. एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, कंपनीचे दोन वरिष्ठ अधिकारी जातीच्या आधारे भेदभाव करतात. त्यामुळे पोलिसांनी कलम ३(१)(कोणत्याही ठिकाणी अनुसूचित जाती जमातीच्या सदस्याचा अपमान करणे), ३ (१)(एस) (शिविगाळ करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेकने एचआरकडे जातीभेदाचा मुद्दा उपस्थित केला होता. परंतु, या त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं.

“३ जून रोजी विवेकने पोलीस तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आत्महत्येपूर्वी दोन वेळा फोन केला. त्याने याबद्दल काहीच सांगितलं नाही. नेहमीच्या गोष्टी आणि माझ्या तब्येतीबद्दल विचारपूस केली. माझा मुलगा माझ्यासाठी सर्वस्व होता,” असे विवेकचे वडील राजकुमार म्हणाले.

विवेकच्या वडिलांनी या मृत्यूसंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. व्हाईटफिल्ड पोलिसांनी कलम ३४ (सामान्य हेतुने अनेक व्यक्तींनी केलेली कृत्ये) आणि ३०६ (आत्महत्येला प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा:

भारत इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामने खेळणार

एमपीएलचा रणसंग्राम आजपासून रंगणार! ऋतुराज आणि केदार आमनेसामने

बिपरजॉय गुजरातला धडकणार! प्रशासन अलर्ट मोड वर

… म्हणून कोलकातामधील विमानतळावर लागली आग

दरम्यान, लाईफस्टाइल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडने एका निवेदनात म्हटलं आहे की, ‘आमच्या माजी कर्मचाऱ्याच्या निधनाची बातमी ऐकून आम्हाला खूप दुःख झाले. विवेकने आमच्या अंतर्गत प्रक्रियेद्वारे तक्रार नोंदवली होती आणि कंपनीच्या धोरणांनुसार संपूर्ण अंतर्गत तपासणी करण्यात आली होती, त्याबाबत विवेकला माहिती देऊन कारवाई करण्यात आली होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आणि पोलिसांकडून तपास केला जात असल्याने आम्ही त्यांच्या तपासाला पूर्ण सहकार्य करत आहोत.’

Exit mobile version